Site Logo
ब्रेकिंग न्यूज़

अचलपूर नगर परिषदेच्या विकासकामांचा आढावा

अमरावती: दररोज मोठ्या प्रमाणात वापरण्यात आलेले पाणी वाया जाते. त्यावर सांडपाणी प्रकल्पाच्या माध्यमातून प्रक्रिया करून त्याचा शेतीसाठी पुनर्वापर शक्य आहे. अचलपूर नगर परिषदेने नियोजनबध्दरित्या आराखडा तयार करुन सांडपाणी प्रक्रिया प्रकल्पाची निर्मिती करावी, यामुळे प्रक्रिया केलेल्या पाण्याचा पुनर्वापर शेतीच्या सिंचनासाठी करता येईल, असे जलसंपदा व लाभक्षेत्र विकास राज्यमंत्री बच्चू कडू यांनी सांगितले. अचलपूर नगर परिषद अंतर्गत येणाऱ्या विविध विकास कामांचा आढावा राज्यमत्र्यांनी घेतला, त्यावेळी ते बोलत होते. अचलपूरच्या नगराध्यक्षा श्रीमती सुनीता फिसके, माजी नगराध्यक्ष हरीशंकर अग्रवाल, रंगलाल नंदवंशी, मुख्याधिकारी अश्विनी वाघमळे यांचेसह सर्व प्रभागाचे नगरसेवक यावेळी उपस्थित होते. भुयारी गटार योजना व सांडपाणी व्यवस्थापन प्रक्रिया प्रकल्पाविषयी, शहर स्वच्छता, सौंदर्यीकरण, रोगराईला प्रतिबंध आदी संदर्भात सादरीकरणाच्या माध्यमातून यश इनोव्हेटीव्ह सोल्युशन कंपनीच्या अधिकाऱ्यांनी सविस्तर माहिती मान्यवरांना दिली. श्री. कडू म्हणाले की, अचलपूर शहराच्या लोकसंख्येच्या प्रमाणानुसार सांडपाणी प्रक्रिया प्रकल्प निर्माण करण्यात यावा. मलनिस्सारण व मलजल वाहिन्यांच्या माध्यमातून सांडपाणी प्रक्रिया केंद्रापर्यंत पोहोचविण्यात येणारे पाणी नियोजनबध्दरित्या कशाप्रकारे पोहोचविता येईल, याचे सर्वेक्षण करुन आराखडा तयार करावा. शहरातील अस्तित्वात असलेल्या रस्ते व नाल्यांचे खोदकाम करतांना कामे सुरळीत तसेच नागरिकांना त्रास न होता नियोजनबध्द करावे. प्रकल्प निर्माण करतांना योग्यप्रकारे मलजल वाहिन्या सुरळीतरित्या कार्यान्वित करता येईल याचा आराखडा व नकाशा तयार करावा. रस्त्यांचे कमी नुकसान होईल व नागरिकांसाठी भुयारी गटार जोडणी करता येईल याची खबरदारी घ्यावी. सांडपाण्यावर प्रक्रिया केल्यावर ते पाणी शेतीसाठी उपयोगात आणता येईल. हा प्रकल्पाचा मुख्य उद्देश असावा. प्रकल्प निर्मितीमध्ये येणाऱ्या तांत्रिक अडचणी व इतर अनुषंगिक बाबी सर्वे करुन शोधून त्यावर सुनियोजित तोडगा सुध्दा काढावा. सांडपाण्यावार प्रक्रिया केल्यावर उपयोगात आणावयाचे पाण्याचे मापदंड, प्रकल्पाच्या देखभालीसाठीचा खर्च, प्रक्रिया केल्यावर पुनर्वापरासाठी पाणी क्षमता, सिंचनासाठीचे शेती क्षेत्रफळ तसेच प्रकल्पासाठी होणारा खर्च आदीबाबत कंपनीच्या तज्ज्ञांनी मान्यवरांना माहिती दिली. यावेळी नगर परिषदेच्या वतीने राज्यमंत्री बच्चू कडू यांचा शाल, श्रीफळ व पुष्पगुच्छ देवून सत्कार करण्यात आला.

Leave A Comment