Site Logo
ब्रेकिंग न्यूज़

महिलांनी विविध योजनांच्या माध्यमातून आर्थिक उन्नती साधावी - जिल्हाधिकारी शैलेश नवाल

अचलपूर, दि. २९ : कुटुंबात विविध जबाबदाऱ्या पार पाडणाऱ्या महिलांमध्ये सामाजिक, आर्थिक व्यवहारातही अग्रेसर राहण्याचे सामर्थ्य आहे. आपली ही ताकद ओळखून महिलांनी उद्योग-व्यवसायाच्या विविध योजनांच्या माध्यमातून आर्थिक उन्नती साधावी, असे प्रतिपादन जिल्हाधिकारी शैलेश नवाल यांनी आज येथे केले. केंद्र शासनाच्या आर्थिक समावेशन धोरणांतर्गत स्टेट बँक ऑफ इंडिया तर्फे महिलांसाठी चावडी मेळावा अचलपूर येथे झाला, त्यावेळी ते बोलत होते. बँकेचे उपमहाव्यवस्थापक रतन बॅनर्जी, क्षेत्रीय प्रबंधक ओमप्रकाश शिवप्रिय, तहसीलदार मदन जाधव, ग्रामीण जीवनोन्नती अभियानाचे विभागीय सल्लागार एच. एम. चौबे, जिल्हा प्रबंधक सचिन देशमुख आदी यावेळी उपस्थित होते. श्री. नवाल म्हणाले की, स्त्री ही कुटुंबात अनेक जबाबदाऱ्या लीलया पार पाडते. तिने आपले सामर्थ्य ओळखून व्यवसायात पाऊल ठेवून आर्थिकदृष्ट्या स्वावलंबी व्हावे.जिल्ह्यात बचत गटांकडून चांगले काम होत आहे. ते अधिक विस्तारले पाहिजे. बँकेने कर्जवाटपाचे प्रमाण वाढवावे. विविध सामाजिक लाभाच्या योजनांतून ग्रामीण महिलांमधील बँकिंगचे प्रमाण वाढून त्या आर्थिकदृष्ट्या सक्षम व्हाव्यात यासाठी केंद्र शासनाने आर्थिक समावेशन धोरण लागू केले आहे. त्यानुसार स्टेट बँक ऑफ इंडिया ने देशातील २०० जिल्ह्यांची निवड केली असून अमरावती जिल्ह्याचा त्यात समावेश आहे, असे श्री. बॅनर्जी यांनी सांगितले. बचत गटांच्या सदस्यांना कर्जवाटपाचे धनादेश यावेळी वितरित करण्यात आले. विविध बँका व लघुउद्योग, व्यवसाय, बचत गट यांच्या सुमारे ५० दालनांचा मेळाव्यात समावेश होता. कार्यक्रमाला परिसरातील शेकडो महिलांची उपस्थिती होती.

Leave A Comment