Site Logo
ब्रेकिंग न्यूज़

जिल्हाधिका-यांनी केली इर्विनची पाहणी

जिल्हा रूग्णालयात आरोग्य व स्वच्छतेच्या दृष्टीने सर्व आवश्यक सुधारणांबाबत प्रस्ताव सादर करावा. रूग्णालयाच्या सुधारणेसाठी वेळेत निधी मिळवून दिला जाईल, असे निर्देश जिल्हाधिकारी शैलेश नवाल यांनी येथे दिले. जिल्हाधिकारी श्री. नवाल यांनी इर्विन रूग्णालयाला भेट देऊन तेथील सोयी- सुविधांची पाहणी केली. यावेळी श्री. नवाल यांनी विविध वॉर्डात भेट देऊन रुग्णांची विचारपूस केली, तसेच राष्ट्रीय पोषण पुनर्वसन केंद्रालाही भेट दिली. जिल्हा शल्यचिकित्सक डॉ. श्यामसुंदर निकम, जिल्हा आरोग्य अधिकारी दिलीप रानमळे, जिल्हा कार्यक्रम अधिकारी अजय साखरे यांच्यासह महापालिका, सार्वजनिक बांधकाम विभागाचे अधिकारी- कर्मचारी यावेळी उपस्थित होते. श्री. नवाल म्हणाले की, रुग्णालयात स्वच्छतेच्या दृष्टीने अद्ययावत यंत्रणा असणे आवश्यक आहे. सफाईची अद्ययावत यंत्रे, वॉर्डात आवश्यक त्या सर्व सुविधा यासाठी प्रस्ताव सादर करावा. यावेळी श्री. नवाल यांनी राष्ट्रीय पोषण पुनर्वसन केंद्राला भेट देऊन अधिकारी- कर्मचारी यांच्याशी संवाद साधला. मेळघाटातील केंद्रात आवश्यक सुविधांसाठी प्रस्ताव देण्याचे निर्देशही त्यांनी दिले. जिल्हा एड्स प्रतिबंध व नियंत्रण समितीची बैठकही यावेळी झाली. एड्सविषयी जनजागृतीसाठी गावोगाव रेड रिबन क्लब स्थापण्यात आले आहेत. जिल्ह्यात १०० गावांत क्लब स्थापण्यात आले आहेत. त्याचप्रमाणे, महाविद्यालयीन स्तरावर ८४ क्लब स्थापण्यात आले आहेत. या क्लबचा सदस्यांचा जागृतीविषयक कार्यात सहभाग वाढवावा, असे निर्देश श्री. नवाल यांनी यावेळी दिले. रुग्णांना सामाजिक लाभाच्या योजनांचा लाभ मिळवून देण्यासाठी प्रयत्न व्हावेत, असेही निर्देश त्यांनी दिले. दि. १ डिसेंबर रोजी एड्सविषयक जनजागृतीच्या अनुषंगाने करावयाच्या पूर्वतयारीबाबतही यावेळी चर्चा करण्यात आली. आरोग्य विभागातील अनेक अधिकारी- कर्मचारी यावेळी उपस्थित होते.

Leave A Comment