Site Logo
ब्रेकिंग न्यूज़

राजकीय घडामोडींमुळे दौऱ्याला उशीर, अवकाळीमुळे पिकांचे मोठे नुकसान - शरद पवार

नागपूर - राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार अवकाळीमुळे शेतीच्या नुकसानीची पाहणी करण्यासाठी विदर्भाच्या दौऱ्यावर आहेत. काल त्यांनी नुकसानीची पाहणी केल्यानंतर आज नागपुरात पत्रकार परिषद घेऊन परिस्थितीवर भाष्य केले. यावेळी ते म्हणाले की, अवकाळीमुळे पिकांचं मोठे नुकसान झाले आहे. मात्र राजकीय घडामोडींमुळे यायला उशीर झाल्याची खंत त्यांनी व्यक्त केली. शेतकऱ्यांना नुकसान भरपाईचे निकष चुकीचे असल्याचे ते यावेळी म्हणाले. तसेच सरकारी आकडेवारीपेक्षा नुकसानीची वास्तविक आकडेवारी अधिक असल्याचे त्यांनी यावेळी सांगितले.नागपूर विभागात संत्र्याचे मोठे नुकसान झाले असून एक बहारच वाया गेला आहे. धान कापूस, सोयाबीनचे देखील मोठे नुकसान झाले आहे. शेतकऱ्यांना नुकसान भरपाईचे निकष चुकीचे आहेत. ३३ टक्केवर नुकसान झाल्यास पंचनामा हे अयोग्य आहे. नुकसानीचे सरसकट पंचनामे हवेत. केंद्राला परिस्थितीचे गांभीर्य माहिती आहे ही शंका असल्याचे म्हणत शरद पवार यांनी सवाल उपस्थित केला आहे. तसेच नुकसानग्रस्तांच्या मदतीसाठी कृषी आणि अर्थ मंत्रालयाकडे पाठपुरावा करणार. पीकविमा विम्याचे पैसे तात्काळ मिळावे यासाठी प्रयत्न करणार असल्याचे ते यावेळी म्हणाले.देवेंद्र फडणवीस जोतिष्य शास्त्राचे अभ्यासक आहेत, हे माहिती नव्हते असे म्हणत पवारांनी फडणवीसांच्या मी पुन्हा येईन या वक्तव्याचा समाचार घेतला.भाजप व राष्ट्रवादी शक्यतेवर बोलताना पवार म्हणाले सध्या काँग्रेस, राष्ट्रवादी आणि शिवसेना सरकारची चर्चा सुरु आहे. राज्यात स्थिर सरकार यावे त्याने विकासाचे काम करावे यासाठी सारे काही करणार आहोत. काँगेस आणि राष्ट्रवादी धर्मनिरपेक्षतेचे आग्रही आहेत. राष्ट्रवादी, शिवसेना आणि काँग्रेसचे सरकार पाच वर्षे चालेल असा विश्वास शरद पवार यांनी यावेळी व्यक्त केला. दरम्यान भाजप आमदार फोडत असल्याची मला माहिती नाही, कुणाकडे असेल तर द्यावी असेही ते यावेळी म्हणाले.

Leave A Comment