Site Logo
ब्रेकिंग न्यूज़

महाराष्ट्र पर्यटन विकास महामंडळ उभारणार काश्मीरमध्ये रिसॉर्ट !

मुंबई: काश्मीरला स्वायत्तता देणारे कलम 370 रद्द केल्यानंतर तेथील विकासाला गती देऊन स्थानिकांचा रोष कमी करण्यासाठी केंद्राबरोबरच भाजपशासित राज्यांनीही पुढाकार घेतला आहे. याचाच एक भाग म्हणून महाराष्ट्र राज्य पर्यटन विकास महामंडळाद्वारे काश्मीरमध्ये पर्यटकांसाठी दोन रिसॉर्ट उभारण्याचा निर्णय आज राज्य सरकारने घेतला. केंद्राने जम्मू-काश्मीरला विशेष राज्याचा दर्जा देणारे कलम 370 रद्द केल्यामुळे राज्याबाहेरील लोकांना तेथे जमीन विकत घेण्याचा मार्ग मोकळा झाला आहे. मात्र जोवर स्थिती निवळणार नाही तोवर तेथे अपेक्षित खाजगी गुंतवणूक होणार नाही. त्यामुळे स्थानिकांच्या उपजीविकेचे प्रमुख साधन असणार्‍या पर्यटन क्षेत्राला प्रोत्साहन देण्याचे केंद्राचे प्रयत्न असून त्याला पूरक भूमिका घेताना जम्मू- काश्मीरमध्ये जमीन विकत घेऊन त्यावर दोन रिसॉर्ट बांधण्याची योजना महाराष्ट्र पर्यटन विकास महामंडळाने आखली आहे. काश्मीर खोर्‍यातील पहलगाम येथे एक आणि लेहमध्ये दुसरे रिसॉर्ट बांधण्याचा प्रस्ताव आहे. यासाठी जागा निश्‍चित करण्याचे काम पुढच्या 15 दिवसात सुरू होईल, असे पर्यटन मंत्री जयकुमार रावल यांनी सांगितले. एमटीडीसीच्या जमिनी खाजगी विकासकाला देणार ! काश्मीरमध्ये नवीन रिसॉर्ट उघडायला निघालेल्या राज्य पर्यटन विकास महामंडळाच्या जमिनी खाजगी विकासकांना भाडेपट्ट्याने देण्याचा निर्णय आज राज्य मंत्रिमंडळाच्या बैठकीत घेण्यात आला. राज्यातील पर्यटनाच्या विकासासाठी महाराष्ट्र पर्यटन विकास महामंडळाला (एमटीडीसी) भाडेपट्ट्याने मंजूर करण्यात आलेल्या सरकारी जमिनींबाबत नव्याने धोरण ठरविण्यात आले असून त्यानुसार महामंडळाला मिळणार्‍या सर्व जमिनी आता वर्ग-2 या प्रवर्गात देण्यास आज झालेल्या मंत्रिमंडळाच्या बैठकीत मान्यता देण्यात आली. मोकळ्या जागा किंवा विकसित प्रकल्प एकवेळचे किमान अधिमूल्य आकारून खाजगी विकासकांना भाडेतत्त्वावर देण्यासही महामंडळास मान्यता देण्यात आली आहे. नवीन धोरणानुसार महामंडळाच्या जमिनी खाजगी विकासकांद्वारे विकसित करण्यासाठी दीर्घ कालावधीकरिता भाडेतत्त्वावर देता येतील. जास्तीत जास्त एकवेळचे किमान अधिमूल्य किंवा महसुली उत्पन्नाचा जास्तीत जास्त वाटा देऊ करणार्‍या विकासकास मोकळी जागा किंवा विकसित प्रकल्प भाडेतत्त्वावर देण्यात येईल तसेच पर्यटन स्थळ म्हणून विकास करण्यासाठी वर्ग 2 चे किल्ले सुद्धा भाडेतत्त्वावर देण्यात येतील.

Leave A Comment