Site Logo
ब्रेकिंग न्यूज़

नदी किनारी सापडला बाप-लेकीचा मृतदेह

2015 साली सिरीयातील एलेन कुर्दी या मुलाचा मृतदेह समुद्रालगत सापडला होता. त्याच्या मृतदेहाचा फोटो व्हायरल झाल्यानंतर जगभरातील लोकांनी हळहळ व्यक्त केली होती. त्यानंतर आता पुन्हा एकदा अशाच प्रकारचा एक फोटो सोशल मीडियावर व्हायरल झाला आहे. अमेरिकेचा शेजारील देश अल सेल्व्हाडोरमधील निर्वासित असलेल्या एका चिमुकलीचा व तिच्या वडिलांचा नदी किनारी सापडलेल्या मृतदेहाचा फोटो बघून अनेकांची मनं हेलावून गेली आहेत.मध्य अमेरिकेच्या जवळ असलेल्या अल सेल्व्हाडोर या देशातील ऑस्कर एलबोर्तो मारटिनेज रॅमिरेज आणि त्याची मुलगी वलेरिया यांचा मृतदेह नदी किनारी सापडला आहे. हा फोटो मेक्सिकोच्या एका वर्तमानपत्रात छापून आल्यानंतर जगभरात खळबळ उडाली होती. अमेरिका व मेक्सिको बॉर्डरवर सध्या वाद सुरू असून या वादामुळे अल सेल्वाडोअरमधील अनेक नागरिकांना त्याचा फटका बसत आहे. अनेक नागरिक अमेरिकेकडे शरण देण्याची मागणी करत आहेत. त्यामुळे रॅमिरेज हा गेल्या काही महिन्यांपासून अमेरिकेत स्थायिक होण्यासाठी प्रयत्न करत होता. तो अमेरिकेकडे शरण मागत होता. रॅमिरेज याची शरण देण्याची मागणी पूर्ण होत नसल्याने तो त्याची पत्नी व त्याची लेक एका बोटीने नदी पार करून अमेरिकेत घुसण्याचा प्रयत्न करत होते. मात्र त्यांची बोट नदीत उलटल्याने रॅमिरेज व त्याच्या लेकीचा मृत्यू झाला. तर त्याची पत्नी या दुर्घटनेतून बचावली आहे.गेल्या वर्षी अमेरिका सीमेवर 283 निर्वासितांचा मृत्यू झाला होता. हा फोट समोर आल्यानंतर अमेरिकेतील ट्रम्प सरकारच्या निर्वासितांविरोधातील धोरणांवरून टीका होत आहे.

Leave A Comment