Site Logo
ब्रेकिंग न्यूज़

एमआयडीसी कार्यालयात वॉटर हार्वेस्टिंगचा प्रयोग जलपुनर्भरणाच्या कार्यात उद्योगांनी सहभागी व्हावे - पालकमंत्री प्रवीण पोटे पाटील

रेन वॉटर हार्वेस्टिंग अत्यंत कमी खर्चात करता येत असून, हा प्रयोग जलपुनर्भरणासाठी उपयुक्त आहे. विविध उद्योगांनीही जलपुनर्भरणाच्या या कार्यात सहभागी व्हावे, असे आवाहन पालकमंत्री तथा उद्योग राज्यमंत्री प्रवीण पोटे पाटील यांनी आज येथे केले. महाराष्ट्र औद्योगिक विकास महामंडळाच्या (एमआ़यडीसी) कार्यालयात रेन वॉटर हार्वेस्टिंग यंत्रणा पालकमंत्री श्री. पोटे पाटील यांच्या उपस्थितीत कार्यान्वित करण्यात आली, त्यावेळी ते बोलत होते. एमआयडीसी इंडस्ट्रीयल असोसिएशनचे अध्यक्ष किरण पातुरकर, महामंडळाचे कार्यकारी अभियंता राहूल बन्सोड, प्रादेशिक अधिकारी सुधीर फुके यांच्यासह विविध उद्योजक व सियाराम, श्याम इंडोफॅब आदी विविध उद्योगांचे प्रतिनिधी यावेळी उपस्थित होते.पाण्याच्या टंचाईवर मात करण्यासाठी रेन वॉटर हार्वेस्टिंग करणे लाभदायी ठरते. त्यानुसार विविध कारखाने, उद्योगांच्या इमारतींवर ही यंत्रणा कार्यान्वित करण्यात यावी. जलयुक्त शिवार योजनेच्या माध्यमातून मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी पाण्याच्या विषयात महत्वाचे कार्य केले आहे. आता आपणही आपल्या उद्योग, आस्थापनांच्या इमारतींवर, तसेच घरोघरी पाण्याचे पुनर्भरण करून आत्मनिर्भर होऊया, असे आवाहन पालकमंत्री श्री. पोटे पाटील यांनी केले.पालकमंत्री श्री. पोटे पाटील यांनी आपल्या अमरावतीतील निवासस्थानी छतावर पडणा-या पावसाच्या पाण्याचे पुनर्भरण करण्यासाठी यशस्वी प्रयोग केला. त्याच धर्तीवर औद्योगिक विकास महामंडळांतर्गत विविध उद्योगांनाही जलपुनर्भरणासाठी आवाहन करण्यात आले आहे. इमारतींवर पडणा-या पावसाच्या पाण्याचे पुनर्भरण करण्यासाठी हा प्रयोग प्लास्टिक ड्रम, पाईप, खड्डा याद्वारे शास्त्रोक्त पद्धतीने करता येतो. त्याला केवळ सोळाशे रूपये खर्च येतो. या प्रयोगामुळे पाण्याचे पुनर्भरण वेगाने आणि खोलवर होते आणि मोठा जलसंचय होतो. बाथरुम, बेसिन, किचनचे पाणी शोषखड्ड्यात सोडल्यास पुनर्भरणासाठी फायदेशीर ठरते.

Leave A Comment