Site Logo
ब्रेकिंग न्यूज़

नवऱ्याची खोटी सही करून मिळवला घटस्फोट, प्रियकराबरोबर थाटला संसार

प्रेमासाठी वाट्टेल ते करणाऱ्यांची या जगात काही कमी नाही. याच उक्तीत बसेल अशी घटना मुंब्रा येथे घडली आहे. इथल्या निलोफर (31) नावाच्या महिलेने दुबईत राहणाऱ्या पतीची म्हणजेच मस्तान यांची खोटी सही करून घटस्फोट मिळवला. एवढेच नाही तर तडकाफडकी प्रियकरासोबत लग्न करुन दुसऱ्यांदा संसारही थाटला. तिचा पहिला नवरा घरी आल्यानंतर निलोफरचं पितळ उघडं पडलं. या नवऱ्याने बायकोविरोधात पोलीस ठाण्यात तक्रार दाखल केली आहे. पोलिसांनी या महिलेविरोधात फसवणुकीचा गुन्हा दाखल केला आहे.दुबईमध्ये मेकॅनिकचे काम करणाऱ्या मस्तान आणि निलोफर यांना नऊ वर्षांचा मुलगा आहे. 2007 साली मस्तान दुबईला गेला होता. मस्तानला वर्षातून एकदा सुट्टी मिळायची आणि तेव्हाच तो घरी यायचा. त्याने निलोफर व मुलासाठी मुंब्रा येथे घरही घेतले होते. नवरा परदेशात असताना निलोफर तिच्या जुन्या प्रियकराच्या संपर्कात आली. त्यांच्यात पुन्हा प्रेमसंबंध जुळले. यानंतर निलोफरचा स्वभाव बदलला, तिच्यात आणि मस्तानमध्ये भांडणं व्हायला लागली. निलोफरने मस्तानकडे मोठे घर घे असा तगादा लावला, यामुळे मस्तानने त्याच भागात 23 लाख रुपये मोजत मोठे घर घेतले.यानंतर मस्तान जेव्हा जेव्हा घरी आला तेव्हा त्याला बायको त्याच्याशी विचित्र वागत असल्याचं जाणवलं. निलोफर सतत मोबईलवर कोणाशी तरी बोलत असायची. घरातील प्रत्येक बारीक सारीक गोष्टी ती समोरच्या व्यक्तीला सांगायची. मस्तानने तिला जाब विचारला असता मी मैत्रिणीसोबत बोलत आहे असं म्हणून निलोफर वेळ मारून न्यायची. मस्तान 2017 साली जेव्हा हिंदुस्थानात आला तेव्हा निलोफर त्याला घरात यायला बंदी केली, ती त्याला भेटायलाही तयार नव्हती. नाईलाजाने त्याला शिळफाटा येथील एका लॉजमध्ये राहावे लागले. निलोफरच्या या वागण्याचे कारण त्याला कळत नव्हते. त्याने याबद्दल शेजाऱ्यांकडे चौकशी केली असता निलोफरने ते घर 32 लाख रुपयांना विकल्याचे त्याला कळाले. हे ऐकून त्याला धक्काच बसला. अवघ्या काही महिन्यातच मस्तान पुन्हा हिंदुस्थानात आला तेव्हा त्याला निलोफरने आपला घटस्फोट झालाय, आता भेटू नकोस असं सांगत त्याला घटस्फोटाची कागदपत्रे दाखवली. त्यावर आपलीच सही असल्याचे बघून मस्तान चक्रावला. पेपरवर एप्रिल 2017 सालची तारीख बघून यावेळी आपण दुबईत होतो हे त्याला आठवले. त्यानंतर त्याने पोलिसात जाऊन निलोफर विरोधात तक्रार दाखल केली. आपला मुद्दा खरा आहे हे दाखवण्यासाठी त्याने पोलिसांना पासपोर्ट,व्हीसा पेपर्स दाखवले. त्यानंतर पोलिसांनी निलोफर विरोधात फसवणूक, बोगस सही करणे, आणि घटस्फोट दिलेला नसतानाही दुसरे लग्न करणे या कलमाखाली गुन्हा दाखल केला.

Leave A Comment