Site Logo
ब्रेकिंग न्यूज़

सायबर सुरक्षा’ मार्गदर्शिकेतून निवडणूक प्रक्रियेसाठी उपयुक्त टिप्स

लोकसभा निवडणूकीत आयोगासह उमेदवार,आणि विविध राजकीय पक्ष सायबर जगताचा मोठ्या प्रमाणात वापर करीत आहेत. निवडणूक विषयक माहितीची सुरक्षितता, संरक्षित पासवर्ड, ईमेल्स, समाज माध्यम वापरताना घ्यावयाची काळजी, फेक न्यूजसह खोडसाळ प्रचार मोहीम राबविण्यासाठी ‘स्पिअर फिशिंग स्कॅम्स’ करणाऱ्यांपासून बचावासाठी कोणत्या दक्षता घ्याव्यात याच्या सूचना ‘महाराष्ट्र सायबर’ कार्यालयाने ‘सायबर सुरक्षा’ या पुस्तिकेद्वारे निवडणूक अधिकाऱ्यांना दिल्या आहेत. लोकसभा निवडणुकीची प्रक्रिया अधिक सुटसुटीतपणे करण्यासाठी आयोगाकडून आधुनिक तंत्रज्ञानाचा, नव्या ॲप्सचा मोठ्या प्रमाणात उपयोग केला जात आहे. उमेदवारांसह राजकीय पक्षांनीही समाज माध्यमांचा वापर प्रचारासाठी सुरु केला आहे. समाज माध्यमांचा गैरवापर होऊ नये आणि निवडणूक प्रक्रिया तांत्रिकदृष्ट्या सुरक्षित रहावी यासाठी ‘महाराष्ट्र सायबर’ ने पुढाकार घेतला आहे. राज्यातील सर्व ४८ लोकसभा मतदार संघातील निवडणूक यंत्रणेला मराठी, हिंदी, इंग्रजी, गुजराती आणि ऊर्दू या भाषेतून प्रकाशित केलेल्या ‘सायबर सुरक्षा’ मार्गदर्शिकेतून महत्त्वाच्या सूचना देण्यात आल्याचे महाराष्ट्र सायबरचे विशेष पोलीस महानिरीक्षक ब्रिजेश सिंह यांनी सांगितले.या पुस्तिकेत समाजमाध्यमांवरील बातम्या, ट्रोलिंग, प्रायोजित मजकूर याबाबतीत जनजागृती करण्याच्या सूचना, फेक ॲप्स आणि संकेतस्थळांबद्दल जागृती करण्याबरोबरच व्यक्तिगत आणि बाह्य उपकरणांच्या वापराविषयी दक्षता घेण्याविषयी मार्गदर्शन करण्यात आले आहे.

Leave A Comment