Site Logo
ब्रेकिंग न्यूज़

मतदार जागृतीसाठी ‘स्वीप’चा उपक्रम पथनाट्यातून मतदारांचे प्रबोधन

स्वीप मोहिमेंतर्गत मतदार जनजागृती मोहिमेत लोकशाही प्रक्रिया, मतदार अधिकार व कर्तव्ये याबाबत प्रबोधन करण्यासाठी पथनाट्य महत्वाची भूमिका बजावत असून, जिल्ह्यात ठिकठिकाणी पथनाट्यांना मोठा प्रतिसाद मिळत आहे.वैचारिक मांडणी करुन नवनव्या विचारांचा प्रसार करण्यात पथनाट्य या कलाप्रकाराचे महाराष्ट्राच्या सांस्कृतिक जडणघडणीत मोठे योगदान आहे. कुठल्याही रंगमंचाविना सरळ रस्त्यावर उभे राहून कलावंत थेट प्रयोग करतात आणि करमणूकीसह प्रबोधनही करतात. शिवाय, बाजार, चौक, गर्दीची ठिकाणे, वसाहती अशा कुठल्याही ठिकाणी थेट नागरिकांपर्यंत पोहोचून हे प्रयोग करणे शक्य असते. हे लक्षात घेऊन पथनाट्याचाही वापर करण्याचे निर्देश जिल्हाधिकारी शैलेश नवाल यांनी दिले होते.त्यानुसार स्वीपच्या नोडल अधिकारी व जि. प. मुख्य कार्यकारी अधिकारी मनीषा खत्री यांनी शाळा- महाविद्यालयांतील मोहिमांप्रमाणेच अधिकाधिक ठिकाणी पथनाट्याचे प्रयोगही सादर करण्याबाबत यंत्रणेला निर्देश दिले व गत अनेक दिवसांपासून मतदार जागृतीविषयक पथनाट्यांचे अनेक प्रयोग जिल्हाभरात होत आहेत. अनेक स्थानिक कलावंत, युवक कलावंत मोठ्या प्रमाणावर जिल्ह्यात ठिकठिकाणी पोहोचून असे प्रयोग सादर करत आहेत. तरूणांचा, विशेषत: नवमतदारांचा या पथनाट्याला मोठा प्रतिसाद मिळत आहे.

Leave A Comment