Site Logo
ब्रेकिंग न्यूज़

लोकसभा सार्वत्रिक निवडणूक 2019 ३५ उमेदवारांकडून ६९ अर्जांची उचल

अमरावती, : लोकसभा सार्वत्रिक निवडणूकीसाठी नामनिर्देशन पत्रे दाखल करावयाच्या कार्यवाहीस आजपासून प्रारंभ झाला. ३५ व्यक्तींनी ६९ अर्जांची उचल केली असून, एकही नामनिर्देशन दाखल झालेले नाही. जिल्हाधिकारी तथा जिल्हा निवडणूक निर्णय अधिकारी शैलेश नवाल, उप निवडणूक निर्णय अधिकारी उदय राजपूत, उपजिल्हा निवडणूक अधिकारी शरद पाटील आदींसह विविध अधिकारी- कर्मचारी अशी यंत्रणा जिल्हाधिकारी कार्यालयात सुसज्ज होती. सकाळी ११ ते ३ या वेळेत नामनिर्देशन पत्रे उपलब्धी व स्वीकृतीची प्रक्रिया राबविण्यात आली. त्यानुसार आज एकही नामनिर्देशन दाखल झाले नाही. अर्जांची उचल करणा-या व्यक्तींची नावे पुढीलप्रमाणे - ॲड. चंद्रशेखर डोरले, प्रा. राजू बोंडे, ज्ञानेश्वर मानकर, मीनाक्षी सुरवाडे, रवींद्र वैद्य, आनंद धवने, महेश तायडे, प्रमोद खडसे, नवनीत राणा, अंबादास वानखडे, प्रतिभा गडलिंग, राहूल मोहोड, जगदीश वानखडे, सुमित्रा गायकवाड, रामकृष्ण महाजन, बाबू बोणे, गोपाल हरणे, दिलीप वानखडे, शैलेंद्र कस्तुरे, राहूल देशमुख, सारंग ढोके, किशोर वानखडे, दिलीप वासनिक, श्रीकांत रायबोले, विवेक गडलिंग, विजय विल्हेकर, ॲड. वामनराव दिघाडे, सय्यद हुसेन, विनोद गाडे,पंकज मेश्राम, राजू जामनेकर, राजू सोनवणे, जगदीश इंगळे, डॉ. रेखा रणबावरे, शीला मेश्राम. नामनिर्देशपत्रे उमेदवाराला किंवा त्याच्या कोणत्याही सूचकाला, निवडणूक निर्णय अधिकारी, 7-अमरावती लोकसभा मतदारसंघ किंवा उपविभागीय अधिकारी, अमरावती तथा सहायक निवडणूक निर्णय अधिकारी, अमरावती यांच्याकडे दि. 26 मार्च 2019 (मंगळवार) पर्यंत सार्वजनिक सुट्टी वगळता कोणत्याही दिवशी सकाळी 11 ते दुपारी 3 वाजेपर्यंत सभागृह क्र. 1, जिल्हाधिकारी कार्यालय, अमरावती येथे दाखल करता येतील. त्याच ठिकाणी नामनिर्देशन पत्र उपलब्ध करुन देण्यात येईल. नामनिर्देशनपत्रांची छाननी दि. 27 मार्च 2019 (बुधवार) रोजी जिल्हाधिकारी कार्यालयात सकाळी 11 वाजता सभागृह क्र. 1 येथे करण्यात येईल. उमेदवारी मागे घेण्याबद्दलची सूचना उमेदवाराला किंवा उमेदवाराने लेखी प्राधिकार दिलेल्या त्याच्या कोणत्याही सूचकाला किंवा निवडणूक प्रतिनिधीला दि. 29 मार्च 2019 (शुक्रवार) रोजी दुपारी 3 वाजेपर्यंत देता येईल. निवडणूक लढविली गेल्यास दि. 18 एप्रिल 2019 (गुरुवार) रोजी सकाळी 7 ते सायंकाळी 6 वाजेपर्यंत मतदान होणार आहे.

Leave A Comment