Site Logo
ब्रेकिंग न्यूज़

मतदानासाठी ओळखपत्र नसले तरी अन्य दस्तऐवजाचा पर्याय

अमरावती, : मतदाराकडे वैध मतदार ओळखपत्र नसेल तरी अन्य 11 दस्तऐवजापैकी एकाचा वापर करून मतदान करता येणार आहे. त्यामुळे जिल्ह्यातील नागरिकांच्या मतदानाचे राष्ट्रीय कर्तव्य पार पाडावे, असे आवाहन जिल्हा निवडणूक अधिकारी शैलेश नवाल यांनी आज येथे केले. जिल्हाधिकारी श्री. नवाल यांनी आज जिल्हाधिकारी कार्यालयात नोडल अधिका-यांच्या कामकाजाचा आढावा घेतला. निवडणूक आयोगाकडून आयोजित व्हिडीओ कॉन्फरन्सिंगमध्ये जिल्हाधिकारी श्री. नवाल, पोलीस आयुक्त संजयकुमार बाविस्कर यांच्यासह अनेक अधिकारी उपस्थित होते. श्री. नवाल म्हणाले की, निवडणूक प्रक्रियेत प्रत्येकाचा सहभाग असावा व मतदानापासून कुणीही वंचित राहू नये, यासाठी निवडणूक आयोगाने ओळखपत्राऐवजी अन्य दस्तऐवजाचाही पर्याय खुला करून दिला आहे. मतदानाचा हक्क बजावण्यासाठी वैध मतदार छायाचित्र ओळखपत्र घेऊन येणे आवश्यक असते. मात्र मतदाराकडे जर वैध मतदार छायाचित्र ओळखपत्र नसेल तर मतदाराने इतर 11 दस्तऐवजापैकी एक ओळखपत्र मतदान केंद्रात सादर करावे. त्याला मतदान करण्याची संधी मिळणार आहे. ते पुढे म्हणाले की, या दस्तऐवजात पासपोर्ट, वाहनचालक परवाना, छायाचित्र असलेले केंद्र, राज्य शासन व सार्वजनिक उपक्रम किंवा सार्वजनिक मर्यादित कंपनीचे कर्मचारी ओळखपत्र, छायाचित्र असलेले बँकेचे पासबुक, पॅनकार्ड, एनपीआरअंतर्गत आरजीआयद्वारे दिले गेलेले स्मार्ट कार्ड, मनरेगा कार्यपत्रिका, कामगार मंत्रालयाद्वारे दिले गेलेले आरोग्य विमा स्मार्ट कार्ड, छायाचित्र असलेले निवृत्तीवेतन दस्तऐवज, खासदार, आमदार यांना दिलेले ओळखपत्र, आधारकार्ड यांचा समावेश आहे. मतदान करण्यासाठी मतदार यादीत नोंद असणेही आवश्यक आहे. त्यासाठी नागरिकांनी नाव नोंदणी किंवा पडताळणीसाठी www.nvsp.in या संकेतस्थळावर भेट द्यावी. मतदान केंद्रावर केवळ छायाचित्र मतदार पावती ही ओळखपत्र पुरावा म्हणून ग्राह्य धरली जाणार नाही तर त्यासोबत मतदार छायाचित्र ओळखपत्र किंवा उपरोक्त 11 ओळखपत्रांपैकी एक ओळखपत्र सादर करणे आवश्यक राहील. प्रवासी भारतीयांनी ओळख म्हणून केवळ पासपोर्टची मूळ प्रत सादर करणे आवश्यक राहील. अधिक माहितीसाठी हेल्पलाईन क्र. 1950 या टोल फ्री क्रमांकावर संपर्क साधण्याचे आवाहनही यावेळी करण्यात आले. उपजिल्हा निवडणूक अधिकारी शरद पाटील, निवासी उपजिल्हाधिकारी नितीन व्यवहारे, खर्च सनियंत्रण पथकाचे नोडल अधिकारी रवींद्रकुमार लिंगनवाड, आचारसंहिता पथक नोडल अधिकारी संदीप जाधव आदी यावेळी उपस्थित होते.

Leave A Comment