Site Logo
ब्रेकिंग न्यूज़

नवीन वाहनांच्या नोंदणीची खात्री करावी प्रादेशिक परिवहन कार्यालयाचे आवाहन

अमरावती, दि. 16 : नवीन वाहनांची नोंदणी करताना काही नागरिक फसवणूक करीत असल्याचे निदर्शनास आले आहे. त्यामुळे नवीन वाहनांच्या नोंदणीच्या वेळी नागरिकांनी सतर्क राहावे. तसेच वाहनांची नोंदणी ऑनलाईन तपासून पहावी, असे आवाहन प्रादेशिक परिवहन विभागातर्फे करण्यात आले आहे. परिवहन विभागाचे कामकाज गेल्या तीन वर्षांपासून ऑनलाईन पद्धतीने करण्यात येत आहे. त्यामध्ये नवीन वाहनाची नोंदणी करणे, अनुज्ञप्ती काढणे, जुन्या वाहनांचा अभिलेख संगणकावर घेणे, योग्यता प्रमाणपत्र नुतनीकरण करणे आदी कामकाज संगणकीकृत करण्यात आले आहे. वाहनांची नोंदणी झाल्यावर नोंदणी प्रमाणपत्र आणि परवाना टपालाद्वारे वाहनधारकास पाठविण्यात येतो. या कार्यालयाच्या असे निदर्शनास आले की, एका व्यक्तीने नवीन वाहनधारकांकडून नोंदणी करण्याच्या कामासाठी शासकीय शुल्क आणि मोटार वाहनकराची रक्कम परस्पर घेऊन ती कार्यालयात भरली नाही. तसेच वाहनधारकास खोटा वाहन क्रमांक आणि खोटी कागदपत्रे दिली आहेत. त्यामुळे मागील दोन-तीन वर्षांत नवीन वाहन विकत घेतलेल्या वाहनधारकांनी आपल्या वाहनांची रितसर नोंदणी झाली असल्याची खात्री कार्यालयाची वेबसाईट parivahan.gov.in/vahan या वेबसाईटवर किंवा प्रादेशिक परिवहन कार्यालयात करावी. वाहनांची नोंदणी रितसर झालेली नसल्यास वाहनाच्या खरेदीची कागदपत्रे सादर करुन मोटार वाहनकर व शुल्क भरुन नोंदणी करावी. नोंदणी केलेली नसलेली वाहने रस्त्यांवर चालवित असल्याचे निदर्शनास आले आहे. त्यामुळे अशा वाहनांची तपासणी मोहिम परिवहन विभागातर्फे राबविण्यात येणार असल्याचे प्रादेशिक परिवहन अधिकारी यांनी कळविले आहे.

Leave A Comment