Site Logo
ब्रेकिंग न्यूज़

लोकसभा सार्वत्रिक निवडणूक 2019 मतदान सहभाग वाढविण्यासाठी गावोगावी जागर

अमरावती, : निवडणूक प्रक्रियेबाबत नागरिकांचा सहभाग वाढावा या हेतूने निवडणूक आयोगाच्या विविध उपक्रमांना जिल्ह्यात सर्वत्र प्रारंभ झाला असून, स्वीप मोहिमेत मतदार जागृतीसाठी शाळा, महाविद्यालये, स्वयंसेवी संस्था, शासकीय कार्यालये, यांच्या सहभागातून गावोगावी जागर सुरु झाला आहे. लोकसभा सार्वत्रिक निवडणुकीत मतदानाचा टक्का वाढावा यासाठी जिल्हा प्रशासनाने कंबर कसली आहे. स्वीप मोहिम गावोगाव सर्वदूर राबविण्याचे आदेश जिल्हा निवडणूक अधिकारी शैलेश नवाल यांनी दिले आहेत. स्वीप मोहिम दि. 15 मार्चपासून राबविण्यास सुरुवात झाली असून सगळ्या यंत्रणांचे अधिकारी- कर्मचारी त्यात सहभागी झाले आहेत. तालुकास्तरीय व गावपातळीवरील यंत्रणेचा सहभाग घेऊन गृहभेटी, प्रभातफेरी, कार्यशाळा आदी कार्यक्रम गावोगाव राबविण्याचे आदेश स्वीपच्या नोडल अधिकारी जि. प. मुख्य कार्यकारी अधिकारी मनीषा खत्री यांनी दिले आहेत. त्यानुसार जिल्हा परिषद, आरोग्य विभाग, सहकार विभाग, पोलीस, परिवहन, शिक्षण अशा अनेक विभागांच्या विविध कार्यालयांतून स्वीप मोहिम राबवली जात आहे. शहरांसह गावपातळीवर आशा स्वयंसेविका, बचत गट, स्वयंसेवी संस्था यांचाही स्वीप मोहिमेला मोठा प्रतिसाद मिळत आहे. शिक्षण विभागातर्फे शाळांना दिलेल्या आदेशानुसार गावोगाव शाळांतील चिमुकले विद्यार्थी मतदार जागराच्या कार्यात उत्साहाने सहभागी होत आहेत. उद्याच्या या मतदारांना लोकशाही प्रक्रियेची शिकवणच या उपक्रमांतून मिळत आहे. आज जिल्ह्यांतील अनेक गावांत शाळांकडून फेरी काढून मतदार जागृती करण्यात आली. शासकीय कार्यालयांसह व सार्वजनिक ठिकाणांसह शाळांच्या इमारतीही मतदार जागृती संदेश फलकांनी सजल्या आहेत. ईव्हीएम व व्हीव्हीपॅटबाबत जनजागृतीही याद्वारे केली जात आहे. सेल्फी पॉइंट, विविध ठिकाणी जिंगल्स, कलापथकाचे सादरीकरण आदी उपक्रम राबविण्यात येत आहेत. नव्या व संभाव्य मतदारांच्या, नागरिकांच्या लोकशाही प्रक्रियेबाबत जाणिवा समृद्ध करणे व नैतिक कर्तव्याचे भान जागविण्याच्या हेतूने प्रत्येक मतदान केंद्रावर चुनाव पाठशाळा तयार करण्याचे निर्देश निवडणूक आयोगाने दिले आहेत. त्यात वय 14 ते 17 वयोगटातील आणि शाळा सुटलेले संभाव्य मतदार, वय वर्षे 18-19 वयोगटातील नवीन मतदार, स्त्रिया (तरुण व मध्यम वयोगटातील) तसेच वरिष्ठ नागरिक यांना सहभागी करुन घेण्यात येणार आहे.

Leave A Comment