Site Logo
ब्रेकिंग न्यूज़

मतदार यादीबाबत तक्रारींचे संपूर्ण निराकरण करण्याबाबत निर्देश आदर्श आचार संहितेच्या अंमलबजावणीसाठी सहकार्य करावे विभागीय आयुक्त पीयुष सिंह यांचे आवाहन

अमरावती, : लोकसभेच्या सार्वत्रिक निवडणुकीचा कार्यक्रम भारत निवडणूक आयोगाने जाहीर केला असल्यामुळे विभागातील सर्व जिल्ह्यात आदर्श आचार संहिता लागू झाली आहे. आदर्श आचार संहितेची काटेकोर अंमलबजावणी करण्यासाठी राजकीय पक्षाच्या प्रतिनिधींसह सर्व घटकांनी सहकार्य करावे, असे आवाहन विभागीय आयुक्त पीयुष सिंह यांनी आज येथे केले. जिल्हाधिकारी कार्यालयात निवडणूक तयारी व आदर्श आचारसंहितेबाबत विविध बैठका आज झाल्या, त्यावेळी ते बोलत होते. जिल्हा निवडणूक अधिकारी शैलेश नवाल, उपजिल्हा निवडणूक अधिकारी शरद पाटील आदी उपस्थित होते. विभागीय आयुक्तांनी जिल्ह्यातील निवडणूक तयारीबाबत माहिती घेऊन विविध सूचना केल्या. विविध राजकीय पक्षांच्या प्रतिनिधींच्या बैठकीत बोलताना जिल्हा निवडणूक अधिकारी श्री. नवाल म्हणाले की, लोकसभा निवडणुकीची प्रक्रिया पारदर्शक पूर्ण करण्यासाठी जिल्हा प्रशासनातर्फे संपूर्ण व्यवस्था पूर्ण करण्यात आली आहे. दिव्यांग मतदारांसाठी निवडणूक आयोगातर्फे विशेष सुविधा उपलब्ध करण्यात येणार असून त्यासाठी दिव्यांग मतदारांना मतदार प्रक्रिया पूर्ण करण्यासाठी त्यांना विचारणा करुन सुविधा देण्याच्या सूचना सहाय्यक निवडणूक अधिकाऱ्यांना देण्यात आल्या आहेत. जिल्ह्यात एक हजार व्हीलचेअर उपलब्ध करुन देण्यात आल्या असून, अतिरिक्त गरज लक्षात घेऊन तीही तरतूद करण्यात येईल. राजकीय पक्ष व उमेदवार यांच्या माहितीसाठी मार्गदर्शिकेचे वितरणही यावेळी सर्व प्रतिनिधींना करण्यात आले. विविध राजकीय पक्षांचे प्रतिनिधी उपस्थित होते. निवडणूकीसाठी नियुक्त नोडल अधिका-यांची बैठक जिल्हाधिकारी श्री. नवाल यांच्या दालनात झाली. एकाच मतदाराची दोनवेळी नोंद होणे आदी स्वरूपाच्या तक्रारी प्राप्त आहेत. त्यामुळे हाऊस टू हाऊस सर्वेक्षण करुन त्याची माहिती तत्काळ सादर करण्याचे निर्देश जिल्हाधिकारी श्री. नवाल यांनी सर्व नोडल अधिका-यांना दिले. मतदार यादीबाबत तक्रारींचे संपूर्ण निराकरण करण्यात यावे. हे काम प्राथम्याने करावे व तत्काळ अहवाल द्यावा, असेही ते म्हणाले. ईव्हीएम व व्हीव्हीपॅट यंत्रणेच्या जनजागृतीबाबत अधिक प्रभावीपणे काम करण्याचे निर्देशही त्यांनी दिले.

Leave A Comment