Site Logo
ब्रेकिंग न्यूज़

प्रधानमंत्री किसान सन्मान निधी योजनेबाबत जिल्हाधिकारी कार्यालयात बैठक

अमरावती,: शेतकरी बांधवांच्या हितासाठी प्रधानमंत्री किसान सन्मान निधी योजना महत्वपूर्ण असून, त्याची प्रभावी अंमलबजावणी होण्यासाठी कालबद्ध कार्यक्रमानुसार वेळेत कार्यवाही व्हावी, असे निर्देश जिल्हाधिकारी ओमप्रकाश देशमुख यांनी आज येथे दिले. पात्र शेतकरी बांधवांनी या योजनेचा लाभ घेण्याचेही आवाहनही त्यांनी केले. योजनेच्या कार्यवाहीबाबत जिल्हास्तरीय समितीच्या जिल्हाधिकारी कार्यालयात झालेल्या बैठकीत ते बोलत होते. अतिरिक्त जिल्हाधिकारी रामदास सिद्धभट्टी, उपजिल्हाधिकारी श्री. महाजन, शिरीष नाईक यांच्यासह विविध तहसीलदार उपस्थित होते. जिल्हाधिकारी श्री. देशमुख म्हणाले की, शेतक-यांना निश्चित उत्पन्न मिळण्यासाठी केंद्र शासनाने प्रधानमंत्री किसान सन्मान निधी योजना लागू केली आहे. त्याचा पात्र शेतकरी बांधवांना लाभ मिळण्यासाठी कार्यक्रमाला गती द्यावी. या योजनेसाठी पात्र शेतक-यांचा मोबाईल क्रमांक, आधार क्रमांक व बँक खात्याचा तपशील तत्काळ प्राप्त करुन घ्यावा. गावनिहाय शेतक-यांची यादी तयार करणे व खातरजमा आणि तपासणीची कार्यवाही 10 फेब्रुवारीपूर्वी करावी. 12 फेब्रुवारीपूर्वी कुटुंबनिहाय वर्गीकरण करुन घ्यावे. 15 फेब्रुवारीपूर्वी माहितीचे संगणकीकृत संकलन करावे. जिल्ह्यातील तलाठी, कृषी सहायक, ग्रामसेवक, मंडळाधिकारी, नायब तहसीलदार, कृषी अधिकारी, तहसीलदार यांनी समन्वयाने विहित मुदतीत कामे पूर्ण करावी, असेही त्यांनी सांगितले. ते पुढे म्हणाले की, शेतकरी कुटुंबाची यादी दि. 15 ते 20 फेब्रुवारी या काळात गावामध्ये यादी प्रसिद्ध करुन हरकती प्राप्त करुन घ्याव्यात. यादीत आवश्यक दुरुस्ती करुन 21 फेब्रुवारीपूर्वी अंतिम यादी तहसील कार्यालयात सादर करावी. तहसील स्तरावर तालुकास्तरावरील समितीने त्याच दिवशी तपासणी करून यादी संकेतस्थळावर प्रसिद्ध करावी. अल्प व अत्यल्पभूधारक शेतक-यांना योजनेत प्रति शेतकरी कुटुंबाला प्रतिवर्ष सहा हजार इतके आर्थिक सहाय्य तीन टप्प्यात मिळणार आहे. वनहक्क कायद्यानुसार जिल्हा समितीने पात्र केलेल्या शेतकरी कुटुंबांचाही योजनेत समावेश होणार आहे. ज्या कुटुंबाचे सर्व ठिकाणचे मिळून लागवडीलायक कमाल धारणा क्षेत्र दोन हेक्टरपर्यंत असेल त्यांना या योजनेचा लाभ मिळणार आहे, असेही त्यांनी सांगितले. जिल्हाधिका-यांच्या अध्यक्षतेखाली जिल्हास्तरीय, उपविभागीय अधिका-यांच्या अध्यक्षतेखाली तालुकास्तरीय समित्या स्थापण्यात आल्या आहेत. तलाठी ग्राम समितीचे प्रमुख असतील. जिल्हा माहिती कार्यालय अमरावती

Leave A Comment