Site Logo
ब्रेकिंग न्यूज़

गोलपिठा काव्यसंग्रहातील प्रतिकांवर आधारीत चित्र ठरली आकर्षण

नवी दिल्ली: कोल्हापूर येथील दळवीज् आर्ट इस्टिट्यूटमधील जेडी आर्ट शाखेच्या अंतिम वर्षाच्या 7 तरूण कलाकारांनी देशाच्या राजधानीत संक्रमण हे अनोखे चित्रप्रदर्शन आयोजित केले आहे. प्रसिध्द कवी नामदेव ढसाळ यांच्या गोलपिठा काव्यसंग्रहातील प्रतिकांवरील चित्र या प्रदर्शनितील आकर्षण ठरत आहे. येथील मंडीहाऊस भागातील रविंद्रभवन कला दालनात दिनांक 6 ते 12 फेब्रुवारी 2019 दरम्यान आयोजित या चित्रप्रदर्शनाचे उद्घाटन जागतिक ख्यातीचे शिल्पकार पद्मभूषण राम सुतार आणि कोल्हापूरचे खासदार धनंजय महाडिक यांच्या हस्ते झाले. या प्रदर्शनीत 7 चित्रकारांची एकूण 54 चित्र मांडण्यात आली आहेत. शुभम चेचर या तरूण कलाकाराची सर्वाधीक 11 चित्र या प्रदर्शनीत मांडण्यात आली असून प्रसिध्द कवी नामदेव ढसाळ यांच्या गोलपिठा या काव्यसंग्रहातील प्रतिकांवर आधारीत चित्र हे खास वैशिष्टय ठरले आहे. गोलपिठातील कवितेच्या ओळींचा उपयोग करून उत्तम चित्रही चेचर यांनी रेखाटले आहे. गुहा चित्रांपासून वास्तव कालीन ते सद्य:कालीन असे चित्रकलेतील संक्रमण त्यांनी आपल्या चित्रांतून मांडले आहे. प्रतिक्षा गणपतराव व्हनबट्टे यांची भित्तीचित्र संकल्पनेवरील एकूण 5 चित्र या प्रदर्शनीत बघायला मिळतात. तंजावर आणि कोल्हापूर येथील शिल्पांना ॲक्रेलीक रंगामध्ये आणि वॉश तंत्रज्ञानाचा उपयोग करून ही चित्रे रेखाटली आहेत. तंजावर येथील सरस्वती महल आणि बीग टेंपल तसेच कोल्हापूर येथील राजाराम महाविद्यालयातील वास्तुंवरील शिल्पही त्यांनी रेखाटली आहेत. दुर्गा विजय आजगावकर यांची कॉन्सेप्‍च्युअल आर्ट प्रकारातील एकूण 7 चित्र याठिकाणी मांडण्यात आली आहेत. भारतीय वास्तुकलेतील महाल पंरपरा त्यांनी ॲक्रेलीक रंगांच्या माध्यमातून आपल्या चित्रांतून दर्शविली आहे. अभिषेक संत यांची अमुर्त शैलीतील 7 चित्रही येथे बघायला मिळतात. रंग, पोत, आकार यांची दृष्य मांडणी करताना मूळ संकल्पनेचा विस्तार अभिषेक यांच्या चित्रांतून दिसून येतो. आकाश झेंडे यांनी कंपोजिशन आर्ट प्रकारातील 10 चित्र या प्रदर्शनीत मांडली आहेत. संकल्प चित्रापासून अमुर्तशैली पर्यंतचा चित्रकलेच्या संक्रमणाचा पटच त्यांनी आपल्या चित्रांतून उलगडला आहे. पुष्पक पांढरबळे यांनी निसर्गातील प्रतिमांचा प्रतिकात्मक वापर करून या प्रतिकांचे प्रतिबिंब दर्शविणारे ॲक्रेलीक आरशे चित्रांमध्ये उत्तमरित्या वापरले आहेत. पांढरबळे यांची 8 चित्रे याठिकाणी आहेत. डोळा व त्यातील प्रतिबिंब दर्शविणारा आरसा हे त्यांच्या चित्रांतील एक उत्तम चित्र दिसून येते. अनिशा पिसाळ यांची 6 चित्र या प्रदर्शनीच्या प्रवेशद्वारावरच आपले लक्ष वेधून घेतात. एमडीएफ वुडकटींगचा प्रभावी वापर करून त्यांनी महाबलीपूरम येथील गंगा अवतरण व अन्य शिल्प आपल्या चित्रांतून दर्शविली आहेत.

Leave A Comment