Site Logo
ब्रेकिंग न्यूज़

गुटखा विक्रीविरुद्ध धडक मोहिम राबवा आमदार डॉ. सुनील देशमुख

अमरावती, : अमरावती व अकोला या दोन जिल्ह्यांतून कर्करोगाचे सर्वाधिक रुग्ण येत असल्याचा नॅशनल कॅन्सर इन्स्टिट्यूटचा अहवाल असून, गुटखा व खर्रा याबाबतची व्यसनाधीनता हेच त्याचे मुख्य कारण आहे. त्यामुळे अवैध गुटख्याविरुद्ध पोलीस व एफडीए यांनी धडक मोहिम राबवावी, असे निर्देश आमदार डॉ. सुनील देशमुख यांनी आज येथे दिले. राष्ट्रीय तंबाखू नियंत्रण समितीच्या जिल्हाधिकारी कार्यालयात झालेल्या बैठकीत ते बोलत होते. जिल्हाधिकारी ओमप्रकाश देशमुख, पोलीस आयुक्त संजयकुमार बाविस्कर, अति. पो. अधिक्षक जयंत मीना, जिल्हा शल्यचिकित्सक डॉ. श्यामसुंदर निकम, निवासी उपजिल्हाधिकारी नितीन व्यवहारे, अन्न व औषध विभागाचे अधिकारी एस. डी. केदारे, बी. के. चव्हाण आदी उपस्थित होते. डॉ. देशमुख म्हणाले की, अमरावती व अकोला जिल्ह्यातून अचानक कर्करुग्ण वाढल्याबाबत नॅशनल कॅन्सर इन्स्टिट्यूटच्या अधिका-यांनी निदर्शनास आणून दिले आहे. त्यात घस्याचा व अन्ननलिकेचा कर्करोग असलेल्या रुग्णांचा समावेश असून, अवैध गुटखा व ओला खर्रा याबाबतची व्यसनाधीनता हेच कारण आहे. अनेक तरुण या व्यसनाच्या जाळ्यात असून, एक पिढी या व्यसनातून बरबाद होत आहे. त्यामुळे पोलीस आणि अन्न व औषध प्रशासन विभागाने विविध विभागांचे सहकार्य मिळवत धडक मोहिम राबवावी. सर्वोच्च न्यायालयाच्या निर्णयानुसार आता गुटखा विक्रेत्याविरुद्ध भारतीय दंडसंहितेतील कलम 328 नुसार अजामीनपात्र गुन्हा दाखल होतो. त्याचा काहीसा धाक निर्माण झाल्याचे श्री. केदारे म्हणाले. त्याबाबत डॉ. देशमुख म्हणाले की, गुटखाबंदीच्या कारवाईत केवळ गोदाम रखवालदारांना पकडून उपयोग नाही. गुटखा रॅकेट कोण चालवते, ते तपासून त्याच्या मुळापर्यंत गेले पाहिजे. धाड टाकल्यावर आरोपीला सुटण्याची संधी मिळता कामा नये. गुन्हे दाखल झाल्यावर गुन्हे सिद्ध होण्याचेही प्रमाण वाढले पाहिजे.

Leave A Comment