Site Logo
ब्रेकिंग न्यूज़

उन्नत भारत अभियानात पाच गावांची निवड - लोकप्रतिनिधींकडून विविध निर्देश

अमरावती: उन्नत भारत अभियान हा प्रधानमंत्री नरेंद्र मोदी व मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या पथदर्शी प्रकल्पातील महत्वाचा घटक असून, सर्व विभागांनी समन्वय साधून हा उपक्रम यशस्वी करण्याचे आवाहन अभियानाच्या बैठकीत करण्यात आले. अचलपूर तालुक्यातील सावळी दत्तुरा, दर्यापूर तालुक्यातील टोंगलाबाद, मोर्शी तालुक्यातील लाडकी (बु.) व अमरावती तालुक्यातील टिमटाळा व यावली शहिद या गावांची निवड झाली आहे. त्यानुसार दत्तक ग्राम विकास आराखडा तयार करण्यासाठी बैठक जिल्हाधिकारी कार्यालयात झाली. आमदार डॉ. अनिल बोंडे, आमदार रमेश बुंदिले, आमदार बच्चू कडू यांनी प्रशासनाकडून या प्रकल्पाच्या अपेक्षित कामांची माहिती घेऊन विविध निर्देश दिले. उपजिल्हाधिकारी रामदास सिद्धभट्टी, जिल्हा नियोजन अधिकारी वर्षा भाकरे, डॉ. डी. टी. इंगोले, प्रकल्पाच्या समन्वयक अर्चना बारब्दे, श्री. शिंगवेकर, राजेश बुरंगे यांच्यासह या गावांचे सरपंच आदी उपस्थित होते. शासनाच्या विविध योजनांची उपयोगिता आणि ग्रामविकास याविषयी शासनाच्या मार्गदर्शनातून व विद्यार्थ्यांच्या कल्पकतेतून दत्तक ग्राम विकास आराखडा तयार करण्यात येत आहे. तंत्रज्ञानाचा योग्य वापर करुन नवीन कौशल्यावर आधारित समस्यांचे संशोधन करुन उपाययोजना करण्याची तरतूद या प्रकल्पात आहे. अत्यंत महत्वपूर्ण असलेल्या या प्रकल्पाच्या यशस्वितेसाठी सर्व विभागांनी समन्वयाने काम करावे, असे निर्देश डॉ. बोंडे यांनी दिले. ग्रामविकासासाठी हा प्रकल्प अत्यंत महत्वपूर्ण असून, विद्यार्थ्यांच्या नवसंकल्पनांना प्रोत्साहन देऊन एक आदर्श ग्रामनिर्मितीचे स्वप्न साकारले जाणार आहे व विद्यार्थ्यांतून सजग नागरिकही या उपक्रमातून घडणार आहेत.

Leave A Comment