Site Logo
ब्रेकिंग न्यूज़

अमरावती विभागात साडे दहा लाख जणांना गोवर, रुबेलाचे लसीकरण

अमरावती: अमरावती विभागातील पाचही जिल्ह्यात गोवर, रुबेलाचे लसीकरण वेगाने करण्यात येत आहे. या लसीकरण मोहिमेला मुलांच्या पालकांचा पाठींबा मिळत असल्यामुळे मोहिम सुरु झाल्यापासून गुरुवार (दि.6 डिसेंबर) पर्यंत 10 लाख 58 हजार 683 जणांना गोवर रुबेलाचे लसीकरण करण्यात आले आहे. विभागातील अमरावती, अकोला, यवतमाळ, बुलडाणा आणि वाशिम जिल्ह्यातील जिल्हा आरोग्य अधिकारी, जिल्हा शल्य चिकित्सक, जिल्हा आरोग्य अधिकारी आणि वैद्यकीय अधिकारी यांचेमार्फत दररोज लसीकरणाचे उद्दिष्ठ ठेवून लसीकरण मोहिम प्रभावीपणे राबविण्यात येत आहे. दिनांक 27 नोव्हेंबर पासून शाळा, अंगणवाडी, बालवाडी तसेच फिरत्या पथकाच्या माध्यमातून लसीकरण करण्यात येत आहे. ही मोहिम पुढे सहा महिन्यापर्यंत सुरु राहणार आहे. गोवर रुबेला पासून लहान मुलांचे संरक्षण करण्यासाठी एकच एमआर नावाची लस उजव्या दंडामध्ये टोचली जाते. ही लस पुर्णपणे सुरक्षित असून यामुळे मुलांना कोणतीही बाधा होत नाही. गोवर रुबेला लसीकरण मोहिमेची सुरुवात 27 नोव्हेंबर रोजी करण्यात आली. या मोहिमेच्या पहिल्याच दिवशी विभागात सुमारे दिड लाख मुलांचे लसीकरण करण्यात आले. या मोहिमेला चांगला प्रतिसाद मिळत असल्याने दर दिवशी जवळपास एक लाख मुलांचे लसीकरण होत आहेत. शाळांव्यतिरीक्त पालक शासकीय रुग्णालयात येऊन लसीकरण करीत आहे. पालकांचा उर्त्स्फुत प्रतिसाद मिळत असल्यामुळे जिल्हा सामान्य रुग्णालयामध्ये विशेष कक्ष उभारण्यात आला आहे. या मोहिमेत 9 महिने ते 15 वर्षे वयोगटातील सर्व बालकांना लस देण्यात येण्यात आहे. या लसीकरण मोहिमेत एकही बालक सुटू नये यासाठी घरोघरी जाऊन ही लस देण्यात येणार आहे. विभागातील सर्वच शाळांमध्ये लसीकरणाबाबत माहिती देण्यात आली आहे. मुलांना लसीकरणाबाबत पालकांचीही सहमती घेण्यात आली आहे. शाळांना विशिष्ठ दिवस देऊन पालकांच्या समक्षच ही लस मुलांना देण्यात येत आहे. यासाठी शाळामधील शिक्षक आणि पालकांचा सहभाग मिळत आहे. या लसीमुळे बालकांचे गोवर आणि रुबेला या आजारांपासून संरक्षण होणार आहे. त्यामुळे पालकांनी सोशल मिडियावरुन प्रसारित होणाऱ्या कोणत्याही अपप्रचाराला बळी न पडता लसीकरणासाठी पुढाकार घ्यावा, असे आवाहन आरोग्य यंत्रणेने केले आहे.

Leave A Comment