Site Logo
ब्रेकिंग न्यूज़
  • अपक्ष उमेदवार काँग्रेस समर्थित नवनीत राणा ३६९५१ मतांनी विजयी
  • राहुल गांधी यांनी नरेंद्र मोदींना दिल्या विजयाच्या शुभेच्छा
  • पालघरमधून शिवसेनेचे राजेंद्र गावित विजयी
  • बारामती येथून सुप्रिया सुळे विजयी
  • सूरतमध्ये कोचिंग इन्स्टिट्यूटच्या इमारतीला आग, 15 विद्यार्थ्यांचा मृत्यू
  • सूरत अग्नीतांडवप्रकरणी मालकासह तिघांना अटक, अनधिकृतपणे सुरू होते क्लासेस

फक्त दीड तास बंद राहणार तुळजाभवानी मंदिराचे दरवाजे

नवरात्रोत्सव कालावधीत प्रत्येक भाविकाला मागील वर्षीपासून प्रवेश पास बंधनकारक करण्यात आला आहे. त्यानुसार मागील वर्षी पास घेऊन घटस्थापना ते अश्विनी पौर्णिमा या कालावधीत नऊ लाख ८६ हजार भाविकांनी दर्शन घेतले होते. यंदा भाविकांच्या संख्येत होणारी वाढ ध्यानात घेऊन मंदिर प्रशासनाने केवळ दीड तास मंदिराचे दरवाजे बंद ठेवण्याचा निर्णय घेतला आहे. दर तासाला सहा हजार भाविकांचे दर्शन होईल, अशी व्यवस्था कार्यान्वित करण्यात आली असल्याची माहिती मंदिर समितीचे अध्यक्ष तथा जिल्हाधिकारी राधाकृष्ण गमे यांनी दिली आहे. सोलापूर, लातूर आणि उस्मानाबाद या प्रमुख तीन मार्गांवरून येणार्‍या भाविकांची संख्या ध्यानात घेवून घाटशीळ मार्गावर प्रवेश पास देण्यासाठी २५ काऊंटर उघडण्यात येणार आहेत. पौर्णिमेसाठी येणार्‍या भाविकांची संख्या सर्वाधिक असल्यामुळे गरजेनुसार ऐनवेळी काऊंटरची संख्या वाढवली जाणार असल्याचेही जिल्हाधिकारी गमे यांनी सांगितले. तुळजाभवानी देवीच्या दर्शनासाठी आलेल्या भाविकांना कोणताही त्रास होऊ नये यासाठी मागील महिनाभरापासून जिल्हा प्रशासन परिश्रम घेत आहे. त्याअनुषंगाने रांगेतील भाविकांची संख्या प्रवेश पासच्या नोंदीमुळे स्पष्ट होणार आहे. त्यामुळे किती वेळेत, किती भाविकांनी दर्शन घेतले याची आकडेवारी दर तासाला उपलब्ध होणार असल्याचे त्यांनी सांगितले. घटस्थापनेपासून विजयादशमीपर्यंत मंदिर दररोज रात्री बारा ते दीड या वेळेत बंद राहणार आहे. तर कोजागिरी पौर्णिमेच्या दिवशी धार्मिक विधीच्या गरजेनुसार रात्री साडेबारा ते दीड वाजेपर्यंत मंदिराचे दरवाजे बंद ठेवले जाणार आहेत. त्यामुळे नवरात्रोत्सव कालावधीत साडे बावीस तास तर कोजागिरी पौर्णिमेच्या दिवशी तुळजाभवानी मंदिर दर्शनासाठी २३ तास खुले असणार आहे. मागील वर्षी प्रवेश पास घेऊन दर्शन घेतलेल्या भाविकांची संख्या आणि देवीचरणी अर्पण झालेली रोकड याचे प्रमाण प्रतिभाविक २० रूपये याप्रमाणे असल्याचे गमे यांनी सांगितले. व्हीआयपी दर्शन यंदाही बंद असून त्याऐवजी भाविकांना पेड दर्शनाची व्यवस्था केली असल्याचे गमे यांनी सांगितले.

Leave A Comment