Site Logo
ब्रेकिंग न्यूज़

निम्न पेढी प्रकल्पाचे काम मार्गी एक हजार 639 कोटी रु. निधीस मान्यता

अमरावती, दि. 2 : जिल्ह्यातील निम्न पेढी प्रकल्पाचे पुढील काम पूर्ण होण्यासाठी एक हजार 639 कोटी रु. निधीस मंत्रिमंडळाने मान्यता दिली आहे. पालकमंत्री प्रवीण पोटे पाटील यांनी यासाठी शासनाकडे विशेष पाठपुरावा केला. जिल्ह्यातील भातकुली तालुक्यासह अकोला जिल्ह्यातील मूर्तिजापूर तालुक्यालाही याचा लाभ होणार आहे. शेती सिंचन, पेयजल पुरवठा, औद्योगिक पाणी वापर व मत्स्यव्यवसाय यासाठी प्रकल्पाचा लाभ होईल. या प्रकल्पाचा प्रधानमंत्री कृषी सिंचन योजनेत समावेश झाला आहे. त्यामुळे प्रथम प्राधान्याने हे काम हाती घेण्यात आले आहे, अशी माहिती पालकमंत्री श्री. पोटे पाटील यांनी दिली. भूसंपादनाच्या किमतीतील वाढ, अभियांत्रिकी बदल, नव्या बाबींचा समावेश यामुळे वाढीव किमतीस सुधारित प्रशासकीय मान्यता मिळणे आवश्यक होते. त्यामुळे मंत्रिमंडळाने तत्काळ मान्यता दिली. या प्रकल्पात पारंपरिक कालवे व वितरण व्यवस्थेऐवजी स्वयंचलित दाबयुक्त नलिका प्रणालीचा वापर करण्यात येणार आहे. त्यामुळे सुमारे अडीचशे कोटी रुपयांची बचत होईल. दुष्काळसदृश परिसरातील 10 हजार 192 हेक्टर क्षेत्रास या प्रकल्पाचा लाभ होणार आहे.

Leave A Comment