Site Logo
ब्रेकिंग न्यूज़

लोकराज्य वाचक अभियानाचा जिल्ह्यात शुभारंभ

अमरावती: देश आणि राज्याच्या सर्वांगीण विकासाचा वेध घेणारे लोकराज्य हे शासनाचे अधिकृत नियतकालिक आहे. स्पर्धा परीक्षेला आवश्यक असणारी तार्किक क्षमता आणि अधिकृत माहिती मिळवण्यासाठी लोकराज्य अत्यंत उपयुक्त आहे, असे प्रतिपादन जिल्हा ग्रंथालय अधिकारी राजेश पाटील यांनी आज येथे केले. . येथील विभागीय ग्रंथालयात जिल्हा माहिती कार्यालयाच्या वतीने आयोजित लोकराज्य वाचक अभियानाच्या शुभारंभप्रसंगी ते बोलत होते. जिल्हा माहिती अधिकारी हर्षवर्धन पवार यांच्यासह अनेक अधिकारी, कर्मचारी, अभ्यासक, विद्यार्थी यावेळी उपस्थित होते. श्री. पाटील म्हणाले की, लोकराज्यमधून सतत नवनव्या विषयांच्या मांडणीमुळे व विधायक भूमिकेमुळे विद्यार्थ्यांना ते उपयुक्त ठरते. त्यातील विश्लेषणात्मक बाबी विद्यार्थ्यांची तार्किक क्षमता वाढवायला मदत करतात. माहिती व जनसंपर्क महासंचालनालयाच्या वार्षिकी या प्रकाशनही महत्वाचे असल्याचे ते म्हणाले. श्री. पवार म्हणाले की, माहितीचा महापूर आणि बहुविध संज्ञापनाच्या आजच्या काळात योजना- शासन निर्णयांबाबत वस्तुनिष्ठ माहिती मिळविण्यासाठी लोकराज्य हे अधिकृत माध्यम आहे. कार्यक्रमाचे प्रास्ताविक लेखापाल योगेश गावंडे यांनी केले. लोकराज्य वितरण सहायक गजानन परटके यांनी आभार मानले. आस्थापना सहायक सविता बारस्कर, हर्षल हाडे, सुरेश राणे, दीपाली ढोमणे यांनी संयोजन केले.

Leave A Comment