Site Logo
ब्रेकिंग न्यूज़

इर्विन रुग्णालयाचा वाढदिवस उत्साहात साजरा

अमरावती, दि. 28 : मेळघटातील रुग्णांपर्यंत तत्काळ पोहचून त्यांना सेवा देणाऱ्या मोटरबाईक रुग्णवाहिका आज कार्यरत होत आहेत. मेळघाटसह सर्वदूर उत्कृष्ट आरोग्य सेवा देण्यासाठी राज्य शासन कटिबद्ध आहे, असे प्रतिपादन पालकमंत्री प्रवीण पोटे पाटील यांनी आज येथे केले. अमरावतीच्या इतिहासात गेली 90 वर्षे अविरत सेवा देणाऱ्या इर्विन रुग्णालयाचा वाढदिवस पालकमंत्री श्री. पोटे पाटील यांच्याहस्ते केक कापून उत्साहात साजरा करण्यात आला. मेळघाटासाठी 5 मोटरबाईक ॲम्बुलंसचे लोकार्पणही पालकमंत्र्यांच्याहस्ते झाले त्यावेळी ते बोलत होते. जि.प. आरोग्य सभापती बळवंतराव वानखडे, जिल्हा शल्य चिकित्सक डॉ.श्यामसुंदर निकम, जिल्हा आरोग्य अधिकारी डॉ. सुरेश आसोले, जिल्हा माहिती अधिकारी हर्षवर्धन पवार आदी उपस्थित होते. पालकमंत्री श्री. पोटे पाटील म्हणाले की, 90 वर्षांचा दीर्घकाळ इर्विन रुग्णालयातून सेवा देणाऱ्या डॉक्टर, परिचर, परिचारिका व कर्मचाऱ्यांचे योगदान जिल्ह्याच्या इतिहासात महत्वपूर्ण आहे. आरोग्य सेवेचे व्रत अंगीकारल्यामुळेच या व्यक्तींकडून सेवा घडत असते. आरोग्य सेवेतील व्यक्तींनाही कौटुंबिक जीवन, गरजा आदी बाबी असतात. हे लक्षात घेऊन नागरिकांनीही त्यांना सहकार्य केल्यास रुग्ण सेवेचा दर्जा उंचाविण्यास अधिक मदत होईल. प्रभावी व जलद यंत्रणा श्री. पोटे पाटील पुढे म्हणाले की, मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस व आरोग्यमंत्री डॉ. दीपक सावंत यांनी घेतलेल्या महत्वपूर्ण निर्णयांमुळे आरोग्यसेवा अधिक प्रभावी झाली आहे. मेळघाटातील चिखलदरा तालुक्यातील काटकुंभ, टेंभुरसोडा, हतरू आणि धारणी तालुक्यातील बैरागड व हरिसाल येथे या पाच मोटरबाईक ॲम्बूलंस कार्यरत असतील. त्यात ट्रॉमा कीट, डिलीव्हरी कीट, इमर्जन्सी मेडीसीन, ऑक्सीसिलेंडर उपलब्ध असेल. डॉक्टर हेच चालक असतील. ते स्वत: तत्काळ रुग्णापर्यंत पोहचून उपचार सुरु करतील, जेणेकरुन रुग्णाची प्रकृती स्थिर होण्यास मदत होईल. गौरवशाली परंपरा इर्विन रुग्णालयाची आरोग्यसेवेची परंपरा गौरवशाली आहे. लॉर्ड व्हॉईसरॉय बॅरॉन इर्विन यांच्या काळात 28 जुलै, 1928 रोजी रुग्णालयाची सेवा सुरु झाली. त्यावेळी उभारण्यात आलेली इमारत आजही सेवारत आहे. अनेक पिढ्यांतील डॉक्टर, परिचर, परिचारिका, स्वच्छक यांनी येथे सेवा बजावली आहे. आजार बदलत गेले, नवे संशोधन निर्माण झाले, तसतसे येथील आरोग्य सेवेतही अनेक स्थित्यंतरे झाली, असे डॉ. निकम यांनी प्रास्ताविकात सांगितले. रुग्णालयाच्या एचआयव्ही व तत्सम रोग नियंत्रण कार्यक्रमाच्या वार्षिक अहवालाची प्रकाशन यावेळी झाले. डॉ. अरुण लोहकपूरे, जिल्हा कार्यक्रम अधिकारी अजय साखरे, समुपदेशक उद्धव जुकरे यांच्यासह आरोग्य सेवेतील अनेक अधिकारी-कर्मचारी यावेळी उपस्थित होते. उमेश आगरकर यांनी सुत्रसंचालन केले.

Leave A Comment