Site Logo
ब्रेकिंग न्यूज़

रेशीम कोष खरेदी केंद्र उभारण्यासाठी पाठपुरावा करणार - जिल्हाधिकारी डॉ.राजेश देशमुख

यवतमाळ, दि.7 : जिल्ह्यात दोन हजार एकरवर रेशीम लागवडीचे उद्दिष्ट ठेवण्यात आले आहे. शेतकरीसुध्दा रेशीम लागवडीकडे वळत आहे. मात्र जिल्ह्यात उत्पादित होणारे रेशीम जालना किंवा रामनगर (कर्नाटक) येथे विक्रीला जात आहे. या शेतक-यांना जिल्ह्यातच बाजारपेठ उपलब्ध व्हावी, या उद्देशाने रेशीम कोष खरेदी केंद्र उभारण्यासाठी पाठपुरावा सुरू आहे, असे प्रतिपादन जिल्हाधिकारी डॉ. राजेश देशमुख यांनी केले. उमरखेड तालुक्यातील सुकळी येथील मनोहर वानखडे यांच्या रेशीम लागवड व किटक संगोपन गृहास जिल्हाधिका-यांनी भेट दिली. समुह प्रमुख मुकूंद नरवाडे, रेशिम उद्योजक, सरपंच व गावातील शेतकरी यांच्याशी संवाद साधतांना ते बोलत होते. उमरखेड व महागाव तालुका रेशिममय होण्याच्या मार्गावर आहे, असे सांगून जिल्हाधिकारी म्हणाले, या तालुक्यातील शेतक-यांनी एक हजार एकरच्यावर रेशीम लागवडीची नोंदणी केली आहे. येथील शेतकरी रेशीमच्या माध्यमातून प्रति एकरी दीड ते दोन लाख रुपये उत्पन्न घेत आहेत. महात्मा गांधी राष्ट्रीय ग्रामीण रोजगार हमी योजनेअंतर्गत रेशीम लागवड व किटक संगोपनगृह बांधकामास अल्पभुधारक शेतक-यांना कुशल व अकुशल कामाकरीता वर्षासाठी 2 लक्ष ९२ हजार ४६५ रुपये प्रति लाभार्थ्यास खर्च दिला जातो. त्यामुळे शेतक-यांना रेशीम शेतीमध्ये रोजगार उपलब्ध होतो. शिवाय कोषापासून होणारे निव्वळ उत्पन्न शेतक-यांना मिळते, असे त्यांनी सांगितले. यावेळी त्यांनी रेशीम लागवड व किटक संगोपन गृहाबाबत समाधान व्यक्त केले. शेतक-यांना रोजंदारीवर होणारा खर्च शासन करीत आहे. शिवाय इतर पिकांपेक्षा कमी खर्च, कमी मेहनत व उत्पन्न जास्त येत असल्यामुळे शेतक-यांनी मोठ्या प्रमाणात रेशीम लागवड करावी, असे आवाहन त्यांनी केले. यावेळी मोठ्या संख्येने परिसरातील शेतकरी उपस्थित होते.

Leave A Comment