Site Logo
ब्रेकिंग न्यूज़

महाराष्ट्रात आर्टिफिशियल इंटिलिजन्स क्लस्टर्सची उभारणी होणार

• नेक्स्ट एआय आणि एफआरक्यूएनटीसोबत सामंजस्य करार • कृषी तंत्रज्ञान, मृद व्यवस्थापन आणि कीड निर्मूलनासाठी मदत • मुख्यमंत्र्यांची कॅनडातील नेते-उद्योगजगताशी सकारात्मक चर्चा मुंबई, दि. 12 : कृषी तंत्रज्ञान, मृद व्यवस्थापन आणि कीड निर्मूलनाच्या क्षेत्रात आर्टिफिशियल इंटिलिजन्सचा वापर वाढविण्यासोबतच त्यासाठी कॅनडातील क्यूबेक प्रांताचे अधिकाधिक सहकार्य मिळण्याबाबत मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या नेतृत्वाखाली राज्याच्या शिष्टमंडळाने आज महत्त्वपूर्ण यश मिळवले. आर्टिफिशियल इंटिलिजन्स क्षेत्रात काम करणाऱ्या आयव्हीएडीओ, नेक्स्ट एआय आणि एफआरक्यूएनटी संस्थांचे सहकार्य महाराष्ट्राला लाभणार असून राज्यात आर्टिफिशियल इंटिलिजन्स क्लस्टर्सची उभारणी होणार आहे. मुख्‍यमंत्र्यांच्या नेतृत्वाखाली राज्याचे शिष्टमंडळ सध्या कॅनडाच्या दौऱ्यावर आहे. आज कॅनडामधील मॉन्ट्रिएल येथे क्यूबेकच्या उपपंतप्रधान श्रीमती डॉमनिक अँग्लेड आणि मुख्यमंत्री यांच्यात आर्टिफिशियल इंटिलिजन्स या तंत्रज्ञानाचा विविध क्षेत्रात वापर करण्याबाबत विचारविनिमय करण्यात आला. महाराष्ट्राने पायाभूत सुविधा क्षेत्रात घेतलेल्या भरारीची श्रीमती अँग्लेड यांनी प्रशंसाही केली. नेक्स्ट एआय आणि एफआरक्यूएनटीसोबत सामंजस्य करार क्यूबेक सरकारचा निसर्ग तंत्रज्ञानविषयक उपक्रम असलेली एफआरक्यूएनटी संस्था आणि महाराष्ट्र सरकार यांच्यात क्यूबेक सिटी येथे सामंजस्य करारावर स्वाक्षरी करण्यात आली. या करारावेळी एफआरक्यूएनटीचे रेमी क्यूरिऑन उपस्थित होते. या कराराप्रमाणे कृषी क्षेत्रात काम करण्यासाठी एक आंतरराष्ट्रीय अभ्यासगट स्थापन करण्यात येणार आहे. या अभ्यासगटाच्या माध्यमातून कीड निर्मूलन, कृषी तंत्रज्ञान आणि माती व्यवस्थापनासाठी आर्टिफिशियल इंटिलिजन्सचा वापर करण्यात येणार आहे. त्याचप्रमाणे आर्टिफिशियल इंटिलिजन्स क्षेत्रात अग्रेसर असलेल्या नेक्स्ट एआय संस्थेसोबतच्या सामंजस्य करारावर देखील स्वाक्षरी करण्यात आली. राज्यातील 50 स्टार्टअप्सना सहकार्य करण्यासाठी महाराष्ट्र सरकारसोबत नेक्स्ट एआय ही संस्था काम करणार आहे. नेक्स्ट एआयचे मुख्य कार्यकारी अधिकारी डॉ. शेल्डोन लेव्ही यावेळी उपस्थित होते. महाराष्ट्रात आर्टिफिशियल इंटिलिजन्स क्लस्टर्स मॉन्ट्रिएल येथे क्युबेकमधील इन्स्टिट्युट ऑफ डाटा व्हॅलोरायझेशनचे (आयव्हीएडीओ) मुख्य कार्यकारी अधिकारी श्री. गिलेस सॅवर्ड यांच्यासोबत आज महाराष्ट्राच्या शिष्टमंडळाची व्यापक चर्चा झाली. आयव्हीएडीओच्या माध्यमातून आर्टिफिशियल इंटिलिजन्स क्षेत्रातील सुमारे एक हजार संघटना एकत्रित काम करीत असून यातून मोठ्या प्रमाणात संशोधन होत आहे. राज्याचा माहिती व तंत्रज्ञान विभाग आणि आयव्हीएडीओ यांच्यात महाराष्ट्रात आर्टिफिशियल एक्सलेटर्सच्या स्थापनेबाबत यावेळी विचारविनिमय करण्यात आला. चर्चेत निश्चित करण्यात आलेल्या कार्यक्रमांमुळे आर्टिफिशियल इंटिलिजन्ससंदर्भातील जागतिक प्लॅटफार्मशी महाराष्ट्र जोडला जाणार आहे. आर्टिफिशियल इंटिलिजन्स क्लस्टर्स तयार करण्यासाठी आयव्हीएडीओसोबत महाराष्ट्रातील आयआयटी आणि विद्यापीठे एकत्रितपणे काम करतील. यावेळी मुख्यमंत्र्यांचे अतिरिक्त मुख्य सचिव प्रवीण परदेशी, माहिती तंत्रज्ञान विभागाचे प्रधान सचिव एस. व्ही. आर. श्रीनिवास, एमआयडीसीचे मुख्य कार्यकारी अधिकारी संजय सेठी आदी उपस्थित होते. आर्टिफिशियल इंटिलिजन्समुळे रोजगारनिर्मिती होणार आर्टिफिशियल इंटिलिजन्समुळे रोजगारसंधी कमी होण्याची शक्यता पूर्णपणे निराधार असून उलट यामुळे मोठ्या संख्येने रोजगारनिर्मिती होईल. अनेक समस्यांचे निराकरण होऊन गरिब-श्रीमंत यांच्यातील दरी भरून निघेल, अशी आशा मुख्यमंत्र्यांनी व्यक्त केली. इंटरनॅशनल इकॉनॉमिक फोरम ऑफ द अमेरिकाच्या वतीने आयोजित प्रशासन आणि आर्टिफिशियल इंटिलिजन्स या विषयावर आयोजित चर्चासत्रात ते बोलत होते. क्यूबेकच्या उपपंतप्रधान श्रीमती डॉमनिक अँग्लेड, युबीसॉफ्टचे कार्पोरेट अफेअर्स उपाध्यक्ष फ्रान्सिस बेटलेट आणि गुगल कॅनडाच्या मुख्य कार्यकारी अधिकारी श्रीमती मेरी जोस लॅमोथ यावेळी उपस्थित होत्या. माहितीची विसंगती पाहता सर्वसामान्यांना प्रदान करावयाच्या सेवांच्या संदर्भात सुद्धा आर्टिफिशियल इंटिलिजन्सचा वापर करण्याचा आमचा प्रयत्न आहे. दुर्गम भागात रूग्णाचे निदान करण्यासाठी या प्रणालीचा वापर अतिशय महत्त्वपूर्ण आहे, असे त्यांनी स्पष्ट केले

Leave A Comment