Site Logo
ब्रेकिंग न्यूज़

औरंगाबादेत दोन गटांत वाद, जाळपोळ-दगडफेकीत दोघांचा मृत्यू, 48 तासांसाठी मोबाईल इंटरनेट सेवा बंद

औरंगाबाद-शहरातील मोतीकारंजा, गांधीनगर, शहागंज, आणि चिकलठाणा भागात शुक्रवारी रात्री दोन गटांत किरकोळ कारणावरून वाद झाला. यानंतर दोन्ही गटांतील हजारोंच्या संख्येने लोक रस्त्यावर उतरले. काही भागात वाहने आणि दुकानांची जाळपोळ करण्यात आली. यावेळी परिस्थितीवर नियंत्रण मिळवण्यासाठी दाखल झालेल्या पोलिसांच्या तुकडीवर जमावाने तुफान दगडफेक केली. पोलिसांच्या गाड्यावर देखील जमावाकडून दगडफेक करण्यात आली. त्यानंतर जमावाला पांगवण्यासाठी पोलिसांनी अश्रुधुराच्या नळकांड्या फोडल्या. परिस्थितीवर नियंत्रण मिळवण्यासाठी पोलिसांनी हवेत गोळीबार केल्याची माहिती आहे. सध्या परिस्थिती नियंत्रणात आली असून शहरातील काही भागात तणावपूर्ण शांतता आहे. तसेच, शहरात 48 तासांसाठी इंटरनेट सेवा बंद ठेवण्यात आली आहे. नागरिकांनी कोणत्याही अफवांवर विश्वास ठेवू नये असे, आवाहन शहरातील विविध पक्षांच्या नेत्यांकडून करण्यात आले आहे. शांतता राखण्याचे अवाहन... दोन्ही गट एकमेकांसमोर भिडल्यनंतर झालेल्या दगडफेकीत दोघांचा मृत्यू झाला असून 25 ते 30 जण जखमी झाले आहेत. यात काही पोलिस कर्मचार्‍यांचा समावेश आहे. सध्या परिस्थिती नियंत्रणात असून नागरिकांनी अफवांवर विश्वास ठेवू नये, असे आवाहन महापौर नंदकुमार घोडेले आणि पोलिस प्रशासनाने केले आहे. तसेच गृहराज्यमंत्री दीपक केसरकर यांनी देखील नागरिकांनी शहरात शांतता राखावी असे आवाहन केले आहे. काय आहे प्रकरण...? दोन दिवसांपासून गांधीनगर आणि मोतीकारंजा परिसरात अवैध नळ कनेक्शन आणि पाणीपट्टी थकीत असलेल्यांवर कारवाईची मोहीम सुरू आहे. असे जवळपास १०० कनेक्शन तोडण्यात आले आहेत. पहिल्या दिवशी या भागातील एका धार्मिकस्थळाचे नळ कनेक्शन तोडण्यात आले, तेव्हा एका गटाने दुसऱ्या एका धार्मिकस्थळाचे नळ कनेक्शन तोडण्याची मागणी केली. यावरुन मनपाच्या अधिकाऱ्यांनी काल दुसऱ्या धार्मिक स्थळाचे नळ कनेक्शन तोडले आणि याच कारणावरुन दोन गट शुक्रवारी सायंकाळी तुंबळ हाणामारी झाली. नंतर इतर भागांत देखील याचे लोण पसरले. एका गटाने मोतीकारंजा रोडवरील दुकानांवर दगडफेक करण्यास सुरुवात केली. यात दुकानांबाहेर असणाऱ्या अनेक वस्तूंचे निकसान झाले. हे पाहून दुसरा गटही रस्त्यावर उतरला. त्यानंतर दोन्ही गटांतील सुमारे सात ते आठ हजारांचा जमाव रस्त्यावर उतरला होता. पोलिसांच्या वाहनांवर दगडफेक... घटनेची माहिती मिळताच शहर पोलिसांचे राखीव दल आणि विविध पोलिस ठाण्यांच्या पेट्रोलिंग व्हॅन घटनास्थळी पोहचल्या. नियंत्रण मिळवण्यासाठी दाखल झालेल्या पोलिसांच्या तुकडीवर जमावाने तुफान दगडफेक करण्यास सुरूवात केली. दरम्यान सहायक पोलिस आयुक्त गोवर्धन कोळेकर, ज्ञानोबा मुंढे, पोलिस निरीक्षक श्रीपाद परोपकारी, हेमंत कदम यांच्यासह अधिकारी आणि कर्मचारी घटनास्थळी दाखल झाले. या वेळी नागरिकांनी केलेल्या दगडफेकीत सहायक पोलिस आयुक्त गोवर्धन कोळेकर यांच्यासह काही पोलीस कर्मचारी जखमी झाले. जमावाला पांगवण्यासाठी पोलिसांनी अश्रुधुराच्या वापर केला. तसेच, पोलीसांकडून हवेत गोळीबार करण्यात आल्याची देखील माहिती आहे. यानंतर पोलिसांनी परिस्थितीवर पुर्णपणे नियंत्रण मिळवले. तरीही रात्री उशिरापर्यंत जमाव आक्रमक होता. घटनेनंतर शहरातील पोलीस बंदोबस्त वाढवण्यात आला असून जालन्याहून अतिरिक्त कुमक मागवल्याचे कळते आहे.

Leave A Comment