Site Logo
ब्रेकिंग न्यूज़

जिल्ह्यात महाराष्ट्रदिन उत्साहात साजरा मुख्य शासकीय सोहळ्यात विभागीय आयुक्तांच्या हस्ते ध्वजारोहण

अमरावती, दि. 1 : महाराष्ट्र राज्य स्थापनेच्या 58 व्या वर्धापन दिनोत्सवाचा सोहळा जिल्ह्यात सर्वत्र उत्साह व मंगलमय वातावरणात पार पडला. येथील जवाहरलाल नेहरु स्टेडियमवर मुख्य शासकीय ध्वजारोहण सोहळ्यात विभागीय आयुक्त पीयुष सिंह यांच्या हस्ते ध्वजारोहण झाले. सोहळ्याला विशेष पोलीस महानिरीक्षक सी. एच. वाकडे, जिल्हाधिकारी अभिजित बांगर, जिल्हा परिषदेच्या मुख्य कार्यकारी अधिकारी मनीषा खत्री, पोलीस आयुक्त दत्तात्रय मंडलिक, महापालिका आयुक्त हेमंतकुमार पवार, अतिरिक्त जिल्हाधिकारी खुशालसिंह परदेशी आदी मान्यवरांसह विविध क्षेत्रांतील नागरिक उपस्थित होते. सोहळ्यात प्रारंभी राष्ट्रध्वज वंदन झाले. त्यानंतर विभागीय आयुक्त श्री. सिंह यांनी जीपमधून विविध पथकांचे निरीक्षण केले. जिल्हा पोलीस दलासह वाहतूक शाखा, शहर पोलीस, अग्निशमन दल, दंगल नियंत्रण पथक, पोलीस बँड आदी विविध पथकांनी शानदार संचलन केले. संचलनाला उपस्थितांनी भरभरून दाद दिली. पोलीस दलात सतत 15 वर्षे उत्तम सेवाभिलेख ठेवल्याबद्दल पोलीस निरीक्षक कैलास पुंडकर यांना मानचिन्ह व प्रशस्तीपत्र देऊन गौरविण्यात आले. हवालदार अंबिकाप्रसाद यादव व पोलीस नाईक भरत मसलदी यांनाही हा सन्मान प्राप्त झाला. पोलीस उपनिरीक्षक जगदीश सावळे, सहा. उपनिरीक्षक उदय रंगारी, हवालदार धनवाल चौरपगार, प्रमोद कडू व अब्दुल सईद अब्दुल कादिर यांना उत्तम सेवेबद्दल मानचिन्ह व प्रशस्तीपत्र देऊन गौरविण्यात आले. प्रा. गजानन देशमुख यांनी सूत्रसंचालन केले. उपायुक्त (महसूल) गजेंद्र बावणे, निवासी उपजिल्हाधिकारी नितीन व्यवहारे, उपजिल्हाधिकारी रामदास सिद्धभट्टी, रमेश काळे, उपविभागीय अधिकारी इब्राहिम चौधरी, तहसीलदार गजेंद्र मलठाणे यांच्यासह अनेकविध अधिकारी- कर्मचारी आणि विविध क्षेत्रांतील नागरिक उपस्थित होते. जिल्हाधिकारी कार्यालयात ध्वजारोहण जिल्हाधिकारी कार्यालयात जिल्हाधिकारी अभिजित बांगर यांच्या हस्ते ध्वजारोहण झाले. त्यानंतर जिल्हाधिकारी श्री. बांगर यांनी अधिकारी व कर्मचा-यांशी हस्तांदोलन करून त्यांना महाराष्ट्रदिनाच्या शुभेच्छा दिल्या. जिल्ह्यात विविध कार्यक्रम जिल्ह्यातील सर्व तालुका मुख्यालये, गावे आदी ठिकाणी शासकीय कार्यालये, शिक्षण संस्था, सामाजिक व स्वयंसेवी संस्था आदींकडून विविध कार्यक्रमांचे आयोजन करण्यात आले. वॉटर कप स्पर्धेतील विविध गावांमध्ये महाराष्ट्र दिनानिमित्त महाश्रमदानाचे आयोजन करण्यात आले.

Leave A Comment