Site Logo
ब्रेकिंग न्यूज़

डॉ. बाबासाहेब आंबेडकर सामाजिक समता सप्ताहाचा समारोप

अमरावती: महामानव भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांनी वंचितांसाठी संपूर्ण आयुष्यभर संघर्ष केला. महामानवांच्या स्मरणातून बोध घेण्याचा प्रयत्न आपण सर्वांनी केला पाहिजे. शिक्षण व इतर गरजांपासून वंचित राहिलेल्या व्यक्तींना मदत करण्याची, आधार देण्याची संवेदनशीलता सर्वांनी जोपासली पाहिजे, असे आवाहन पालकमंत्री प्रवीण पोटे- पाटील यांनी आज येथे केले. सामाजिक न्याय विभागाच्या विभागातर्फे डॉ. बाबासाहेब आंबेडकर सामाजिक समता सप्ताहाच्या समारोप प्रसंगी ते बोलत होते. जिल्हाधिकारी अभिजित बांगर, प्रादेशिक न्याय सहायक वैज्ञानिक प्रयोगशाळेचे उपसंचालक डॉ. विजय ठाकरे, समाज कल्याण उपायुक्त दीपक वडकुते, जातपडताळणी समितीचे उपायुक्त सुनिल वारे, पालकमंत्र्यांचे स्वीय सचिव अनिल भटकर, तहसीलदार गजेंद्र मलठाणे, जिल्हा माहिती अधिकारी हर्षवर्धन पवार, समाजकल्याण अधिकारी प्राजक्ता इंगळे, विशेष अधिकारी दीपा हिरोळे, सुरेश स्वर्गे आदी उपस्थित होते. श्री. पोटे- पाटील म्हणाले की, डॉ. बाबासाहेब आंबेडकरांचे जीवन प्रत्येकासाठी प्रेरणादायी आहे. शिक्षणाशिवाय प्रगती अशक्य आहे. शिक्षणाचा प्रसार तळागाळापर्यंत झाला पाहिजे, यासाठी त्यांनी तळमळीने कार्य केले. त्यामुळे त्यांच्यापासून आदर्श घेताना आपण सर्वांनी वंचितांना पुढे येण्यास निरपेक्षपणे मदत केली पाहिजे. शिक्षणापासून वंचित राहणा-या विद्यार्थ्यांची निवड करुन त्यांच्यासाठी दरवर्षी साडेतीन कोटी रुपयांची मदत संस्थेच्या माध्यमातून मी करत आलो आहे, असेही त्यांनी सांगितले. श्री. बांगर म्हणाले की, देशातील तरूणाई ही देशाची मोठी ताकद आहे. तरुणाईने डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांचे विचार अंगीकारून त्याप्रमाणे वाटचाल केल्यास संपूर्ण समाज उन्नत होऊन देश अधिक प्रगतीपथावर जाईल. कर्मवीर दादासाहेब गायकवाड सबळीकरण योजनेतून विविध लाभार्थ्यांना जमीनपट्टयांचे वाटप यावेळी करण्यात आले. रवींद्र सेवतकर, उमेश तांडेकर, विमल शिरसाट, अरविंद वानखडे, संजय सरगटे, धनराज बोरकर, माणिकराव आठवले, बेबी ढाक, संतोष वरघट, रामाजी वानखडे, सुरेश मोहोड, सुनंदा स्थुल, अस्मिता गावंडे, अवधुत वानखडे, स्वरुपचंद गेडाम आदींना हा लाभ मिळाला. राजर्षी शाहू महाराज पुरस्कार प्राप्त गुणवंत विद्यार्थी पायल कलाने, लोकेश हेले, दीपाली पाचरे, रिया पंडागळे, दीपाली निपाने, प्रज्वल आठवले, गौरी केळकर, प्रतिक गावंडे, शितल मनोहरे व प्रीती इंगळे यांना 5000 रुपये पारितोषिक व प्रमाणपत्र देऊन गौरवण्यात आले. श्रीमती इंगळे यांनी प्रास्ताविकात सप्ताहातील विविध कार्यक्रमाची माहिती दिली.

Leave A Comment