Site Logo
ब्रेकिंग न्यूज़

गुलाबी बोंडअळी प्रादुर्भाव नियंत्रणासाठी सूचना

गत हंगामात कपाशीवरील गुलाबी बोंड अळीचा प्रादुर्भावामुळे पीकाचे मोठे नुकसान झाले. त्यामुळे गुलाबी बोंड अळीचा जीवनक्रम खंडित करण्याच्या दृष्टीने शेतक-यांनी उपाययोजना करण्याचे आवाहन कृषी विभागाने केले आहे. कृषी विभागाच्या मार्गदर्शक सूचना पुढीलप्रमाणे : 1. उन्हाळ्यात जमिनीची खोल नांगरणी करावी जेणेकरुन किडीच्या जमिनीत असलेल्या अवस्था (उदा. कोष) वर येऊन उन्हामुळे नष्ट होतील किंवा पक्षी त्यांना टिपून खातील. 2.कपाशीची धसकटे, पालापाचोळा जमा करुन कंपोस्ट खड्ड्यात टाकावी. याप्रमाणे स्वच्छता मोहिम राबवून संपूर्ण शेत तथा बांध स्वच्छ करण्यात यावे. 3. किडीच्या जीवनक्रमात अडथळा निर्माण करण्यासाठी पिकांची फेरपालट करणे अत्यंत आवश्यक आहे. त्यामुळे यावर्षी कपाशी घेतलेल्या शेतात पुढील हंगामात कापुस लागवड करु नये. पूर्वी तृणधान्य, कडधान्य, गळीत धान्य लागवड केलेली जमीन कापुस लागवडीसाठी निवडावी, या हंगामात कपाशीच्या सभोवती नॉन-बीटी (रेफ्युजी/आश्रीत पीक) कपाशीची लागवड करावी. तसेच कपाशीवरील किडीच्या नैसर्गिक शत्रू किटकांचे संवर्धन होण्यासाठी मका, चवळी, उडीद, मुग, झेंडू व एरंडी या मिश्र सापडा पिकांची एक ओळ लावावी. याप्रमाणे नियोजन केल्यास निश्चितच गुलाबी बोंड अळीवर नियंत्रण करणे शक्य होईल. 4.शेतकऱ्यांनी कृषि सेवाकेंद्रावरून खात्रीच्या बियाणांची खरेदी करावी व खरेदीची पावती संबंधित कृषि सेवा केंद्राकडून घ्यावी. व ती जतन करावी. तसेच पेरणीच्यावेळी पिशवी उलट्या बाजूने फाडून पिशवीवरील अत्यावश्‌यक माहिती जसे लॉट नंबर, वाण स्वत:कडे जपून ठेवावी. 5. कपाशीची हंगामपूर्व लागवड टाळावी. जून महिन्यात लागवड करण्यात यावी. 6.युरियाचा खताचा जास्त वापर टाळावा. 7. पिकाच्या सुरुवातीच्या वाढीच्या 3 महिन्यापर्यंत किटकनाशकाचा वापर टाळावा, जेणेकरुन मित्र किडीचे संरक्षण होईल. या काळात वनस्पतीजन्य किटकनाशके, जैव किटकनाशके, मित्र किडीचा वापर करावा. 8.पिकांच्या लागवडीनंतर 45 दिवसात फेरोमन ट्रॅप्सचा वापर प्रति हेक्टरी 5 या प्रमाणे वापर करावा व पिकातील बदलाची निरिक्षणाची नोंद घ्यावी. 9. पीक लागवडीपासून काढणीपर्यंत दर आठवड्याला पिकांमधील किड रोगाचे व पिकांच्या अवस्थेचे सुक्ष्म अवलोकन केल्याने किडीच्या प्रादुर्भावाची तिव्रता पाहून आर्थिक नुकसानाची पातळी गाठली असल्यासच फक्त रासायनिक किटक नाशकांचा वापर करावा. 10. रासायनिक किटक नाशकांचा वापर आवश्यकता असेल तेव्हाच व शिफारस केल्याप्रमाणे करावा. अधिकाधिक किटक नाशके एकत्र मिसळून फवारणी वा जास्त मात्रेत फवारणी घातक ठरु शकते ती टाळावी. वरील प्रमाणे उपाययोजना करुन पुढील हंगामात कपाशीवरील बंदोबस्तासाठी शेतकरी बंधू भगिनींनी एकात्मिक किड रोग व्यवस्थापन पद्धतीचा अवलंब करण्याचे आवाहन विभागीय कृषी सहसंचालक सुभाष नागरे व जिल्हा कृषी अधिक्षक अधिकारी अनिल खर्चान यांनी केले आहे.

Leave A Comment