Site Logo
ब्रेकिंग न्यूज़

विद्यार्थ्यांना गुणवत्तापूर्वक शिक्षण मिळावे यासाठी शासन प्रयत्नशील

शिक्षण क्षेत्रात नवनवीन प्रयोग करण्यात येत असून राज्यात बहुजन समाजातील विद्यार्थ्यांना गुणवत्तापूर्वक शिक्षण मिळावे यासाठी शासन विविध उपाययोजना करीत आहे व त्यापुढेही गतीने करण्यात येईल, असे शिक्षण मंत्री विनोद तावडे यांनी आज विधान परिषदेत सांगितले. शिक्षण क्षेत्रासंबंधी विविध प्रश्नांच्या अनुषंगाने नियम 260 अन्वये विरोधी पक्षनेते धनंजय मुंडे व अन्य सदस्यांनी मांडलेल्या प्रस्तावास उत्तर देताना श्री. तावडे बोलत होते. श्री.तावडे पुढे म्हणाले, मुलांचा अभ्यासक्रम निवडताना त्यांना कुठल्या विषयात किती गुण मिळाले यापेक्षा त्यांचा कोणत्या विषयाकडे कल आहे त्यानुसार शाखा निवडणे व त्यांच्या गुणवत्तेला वाव मिळावा यासाठी कल मापन चाचणी सुरु केली. दहावी नापास झालेल्या विद्यार्थ्यांची पुनर्रपरीक्षा घेऊन त्यांचे वर्ष वाचविले. यामुळे कित्येक मुले पुन्हा शिक्षणाच्या प्रवाहात आली. अभ्यासक्रमाच्या बदलाच्या अनुषंगाने विद्या प्राधिकरणाच्या एका छत्राखाली सर्वांना एकत्र आणून पाठ्यपुस्तक तयार करण्याचे काम केले. ज्या शाळेत पट संख्या 10 पेक्षा कमी आहे अशा शाळांचे समायोजन करुन मुलांना अधिक चांगले शिक्षण मिळण्यासाठी दुसऱ्या शाळेत समाविष्ट केले. कमी दृष्टी असलेल्या मुलांसाठी मोठ्या अक्षरांची पाठ्यपुस्तके दिली. दप्तराचे ओझे कमी करण्यासाठी, शिष्यवृत्तीसाठी वेगळी परीक्षा घेतली. मुलांच्या गळतीचे प्रमाण कमी होण्यासाठीही विविध उपाययोजना करण्यात आल्या आहेत. ज्या ठिकाणी 8 वी पर्यंतच शाळा असल्याने आदिवासी व अल्पसंख्याक मुले शाळा सोडत असल्याचे निदर्शनास आल्याने अशा ठिकाणी जिल्हा परिषदांच्या शाळा 10 वी पर्यंत सुरु केल्या आहेत. श्री. तावडे म्हणाले, शिक्षकांचे प्रश्न महत्वाचे असल्याने ते सोडविण्यासाठीही विविध उपाययोजना करण्यात येत आहेत. जे शिक्षक नवीन प्रयोग करुन चांगले काम करीत आहेत अशा शिक्षकांचे प्रयोग इतर ठिकाणी दाखविण्यात येत आहेत व त्यांच्या कामाला प्रोत्साहीत करण्यात येत आहे. प्राध्यापकांचे तासांचे मानधन वाढविण्याबाबत मुख्यमंत्र्यांबरोबर बैठक घेऊन धोरणात्मक निर्णय घेण्याच्या दृष्टीने प्रयत्न करण्यात येईल. शिक्षकांना पुरस्कार देण्यासाठी त्यांचे ऑनलाईन अर्ज मागविल्यामुळे गुणवंत शिक्षकांना पुरस्कार मिळाला आहे. शासनाने गोपीनाथ मुंडे अध्यासन स्थापन केले असून त्याचा आराखडा तयार झाला आहे. यासाठी प्राथमिक निधी दिला आहे. महात्मा फुले, राजर्षी शाहू, डॉ.आंबेडकर यांच्या महाराष्ट्रात बहुजन समाजातील विद्यार्थ्यांना गुणवत्तापूर्वक शिक्षण देण्यासाठी सर्वांनी पाठिंबा द्यावा, असेही श्री.तावडे यांनी यावेळी सांगितले.

Leave A Comment