Site Logo
ब्रेकिंग न्यूज़

उंदीर निर्मूलनासाठी ३ लाख १९ हजार ४०० विषारी गोळ्यांचा वापर

मंत्रालयातील प्रशासकीय दस्तावेज तसेच विद्युत तारांचे आणि इंटरनेटवर्कच्या केबल्स सुरक्षित राहण्याच्या दृष्टीने प्रतिबंधात्मक उपाययोजना म्हणून उंदिर निर्मूलनासाठी विषारी गोळ्या टाकण्याचे काम १९८४ पासून करण्यात येते. यंदा ३ लाख १९ हजार ४०० इतक्या उंदीर प्रतिबंधात्मक विषारी गोळ्या टाकण्यात आल्या होत्या, अशी माहिती महसूल मंत्री चंद्रकांत पाटील यांनी आज विधानसभेत तसेच विधान परिषदेत दिली. मंत्रालयातील उंदीर निर्मूलनाकरिता केलेल्या कार्यवाहीसंदर्भातील निवेदन श्री. पाटील यांनी विधानसभेत तसेच विधान परिषदेत सादर केले. यावेळी श्री. पाटील म्हणाले, मंत्रालय मुख्य इमारत, विस्तारित इमारत आणि मंत्रालय आवार या ठिकाणी मंत्रालयातील उंदरांमुळे नुकसान होऊ नये यासाठी विविध विभागांच्या मागणीनुसार प्रतिबंधात्मक उपाययोजना करण्यात आल्या आहेत. सार्वजनिक बांधकाम विभागाकडून ३३ टक्के कामे ही मजूर संस्थांना दिली जातात. मंत्रालय मुख्य इमारत आणि मंत्रालयातील विस्तार इमारतीकरिता प्रत्येकी २ लाख ४० हजार रकमेच्या दोन कामांना मंजुरी देण्यात आली. दोन्ही कामांच्या निविदा मे. विनायक मजूर सहकारी संस्था मर्यादित यांना देण्यात आल्या असून काम पूर्ण करण्याची विहीत मुदत दोन महिन्यांची होती. मात्र, विहित कालावधीपूर्वीच काम पूर्ण करण्यात आले. तसेच, अंदाजपत्रक व निविदेत नमूद संख्या ही या कामांतर्गत संपूर्ण मंत्रालय व परिसरात ठेवलेल्या ३ लाख १९ हजार ४०० विषारी गोळ्यांची असून ती संख्या मारलेल्या उंदरांची नाही, असेही श्री. पाटील यांनी निवेदनाद्वारे स्पष्ट केले. श्री. पाटील म्हणाले, या संस्थेने केलेल्या कामाच्या देयकाची रक्कम संस्थेच्या मुंबई जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँकेत जमा करण्यात आली आहे.

Leave A Comment