Site Logo
ब्रेकिंग न्यूज़

योजनांच्या अंमलबजावणीला गती द्यावी- किशोर तिवारी

जिल्ह्यातील विविध प्रलंबित कामे पूर्ण करुन शेतकरी हिताच्या योजनांच्या अंमलबजावणीला गती देण्याचे निर्देश कै. वसंतराव नाईक शेती स्वावलंबन मिशनचे अध्यक्ष किशोर तिवारी यांनी आज येथे दिले. जिल्ह्यातील विविध कामांचा आढावा श्री. तिवारी यांनी जिल्हाधिकारी कार्यालयातील बैठकीत घेतला, त्यावेळी ते बोलत होते. विभागीय आयुक्त पियूष सिंह, जिल्हाधिकारी अभिजित बांगर, जिल्हा परिषदेच्या मुख्य कार्यकारी अधिकारी मनिषा खत्री यांच्यासह विविध विभागांचे अधिकारी-कर्मचारी यावेळी उपस्थित होते. श्री. तिवारी म्हणाले की, शेतकऱ्यांच्या हितासाठी राज्य शासनाने अनेक योजना कार्यान्वित केल्या आहेत. प्रशासनाने त्यांची काटेकोर अंमलबजावणी करणे आवश्यक आहे. आगामी खरीप हंगाम लक्षात घेता नवीन पीक कर्ज देण्यासाठी मागेल त्याला पीक कर्ज मोहिम सुरु करण्यासाठी पूर्ण तयारी करावी, कोणीही पात्र व्यक्ती वंचीत राहता कामा नये. पीक नियोजन करतांना कापसावरील किड, रोग तसेच विविध पीकांच्या भावात झालेली घसरण या सर्व बाबींचा विचार करुन नियोजन केले पाहिजे. बळीराजा चेतना अभियान महसूल, ग्राम विकास, सहकार व कृषीसह ग्रामीण भागातील कामांचा आढावा ही त्यांनी घेतला. नानाजी देशमुख कृषी संजीवनी योजना, महात्मा फुले जनकल्याण योजना, कृषी पंप व वीज जोडणी, शामाप्रसाद मुखर्जी योजना, जलयुक्त शिवार योजना, पेयजल नियोजन, दुग्ध, मत्स्य, आरोग्य, वन, आदिवासी ग्राम विकास, ग्रामीण भागातील कायदा व सुव्यवस्था, शेतकरी गट शेती, पेसा, सहकार आदी विविध विषयांच्या आढावा घेतांनाच या योजनांची कामांना गती देऊन तसा अहवाल सादर करण्याचे निर्देश त्यांनी दिले. यावेळी जिल्ह्यातील सर्व विभागप्रमुख उपस्थित होते.

Leave A Comment