Site Logo
ब्रेकिंग न्यूज़

अॅट्रॉसिटीसाठी रामदास आठवले मैदानात, म्हणाले नरेंद्र मोदींची राहुल गांधींशी तुलना अशक्य

पंतप्रधान नरेंद्र मोदींची राहुल गांधींशी तुलना अशक्य असून अॅट्रॉसिटी अॅक्टबाबत रिपाईतर्फे (आठवले) पुनर्विचार याचिका दाखल करणार असल्याचे रिपाई (आठवले) नेते केंद्रीय मंत्री रामदास आठवले यांनी म्हटले आहे. मुंबईत सह्याद्री शासकीय अतिथीगृहात झालेल्या पत्रकार परिषदेत ते बोलत होते. पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि काँग्रेस अध्यक्ष राहुल गांधी या दोघांची तुलना होऊ शकत नाही. 2019 मध्येही निवडणुका भाजप आणि एनडीएच जिंकणार आहे. कदाचित जागा थोड्या फार कमी होतील पण पंतप्रधानपदी पुन्हा नरेंद्र मोदीच विराजमान होतील असा विश्वास केंद्रीय मंत्री रामदास आठवले यांनी व्यक्त केला. जोपर्यंत राहुल गांधी नरेंद्र मोदींना टक्कर देत आहेत तोपर्यंत नरेंद्र मोदीच जिंकणार आहेत यात माझ्या मनात काहीही शंका नाही असेही त्यांनी म्हटले आहे. 2014 च्या निवडणुकांच्या वेळी काँग्रेसचे देशभरात पानिपत झालेले बघायला मिळाले. मात्र त्यानंतरच्या पुढच्या निवडणुकांमध्ये खास करून गुजरात विधानसभा निवडणुकांमध्ये काँग्रेसने भाजपला टक्कर दिली. त्यामुळे 2019 च्या लोकसभा निवडणुकांमध्ये आपण भाजपला टक्कर देऊ शकतो असा विश्वास काँग्रेसमध्ये निर्माण झाला. मात्र आठवलेंनी या सगळ्या शक्यता मोडीत काढत 2019 मध्ये भाजपचीच सत्ता येणार आहे असा विश्वास व्यक्त केला. अॅट्रॉसिटी अॅक्ट बाबत सुप्रीम कोर्टाने दिलेल्या निर्णयावर आम्ही समाधानी नाही म्हणूनच रिपब्लिकन पार्टी ऑफ इंडियातर्फे आम्ही सुप्रीम कोर्टात पुनर्विचार याचिका दाखल करणार आहोत असेही आठवले यांनी म्हटले आहे. काही बाबतीत या कायद्याचा दुरुपयोग झाला असेल पण तो सरसकट होत नाही म्हणूनच आम्ही पुनर्विचार याचिका दाखल करणार आहोत असेही आठवले यांनी म्हटले आहे.

Leave A Comment