Site Logo
ब्रेकिंग न्यूज़

अमरावतीत भव्य जिल्हा कृषी महोत्सव

कृषी विभाग व कृषी तंत्रज्ञान व्यवस्थापन यंत्रणा (आत्मा) यांच्या संयुक्त विद्यमाने दि. १७ ते २१ मार्चदरम्यान भव्य जिल्हा कृषी महोत्सव सायन्सकोर मैदानावर होणार आहे. या महोत्सवात शेती व विविध शेतीपूरक व्यवसायांबाबत मार्गदर्शन मिळणार असून, जिल्ह्यातून अधिकाधिक शेतक-यांनी महोत्सवाचा लाभ घ्यावा, असे आवाहन कृषी महोत्सव संयोजन समितीचे अध्यक्ष जिल्हाधिकारी अभिजित बांगर यांनी आज येथे केले आहे. कृषीमंत्री भाऊसाहेब फुंडकर, कृषी राज्यमंत्री सदाभाऊ खोत, पालकमंत्री प्रवीण पोटे- पाटील, नगरविकास राज्यमंत्री डॉ. रणजीत पाटील यांच्या उपस्थितीत महोत्सवाचे उद्घाटन शनिवारी (दि. १७) सकाळी १० वाजता होईल. महोत्सवात सेंद्रिय शेतीमाल विक्री व प्रदर्शन, धान्य व खाद्य महोत्सव, सेंद्रिय शेतीमाल प्रमाणीकरण, विक्रेता खरेदीदार संमेलनाचा समावेश आहे. जिल्ह्यातील कृषी उत्पादनांना महोत्सवात प्राधान्य देण्यात आले असून, जिल्ह्यातील काळ्या कसदार मातीतील सेंद्रिय उत्पादने उपलब्ध असतील. महोत्सवात संत्रा, कापूस, कांदा व भाजीपाला पीकांविषयी स्वतंत्र परिसंवाद असतील. प्रयोगशील शेतक-यांना विविध पुरस्कारांनी यावेळी गौरविण्यात येणार आहे. त्याशिवाय, शेतकरी उत्पादक ते थेट ग्राहक विक्री, शेतकरी उत्पादक कंपन्यांची सद्य:स्थिती व भविष्यातील वाटचाल, जलयुक्त शिवार अभियानाचे जिल्ह्यातील योगदान व यशस्विता, नियंत्रित शेतीचे व्यवस्थापन, कृषीनिविष्ठा, सिंचन साधने व तंत्रज्ञान, विविध कृषी अवजारे व यंत्रे, शेतमाल आधारित प्रक्रिया उद्योग व निर्यात, कृषीविषयक साहित्य, पशुसंवर्धन, विपणन आदी विविध विषयांवर अनेक कक्षांतून माहिती व मार्गदर्शन केले जाणार आहे. कृषी विभाग, कृषी संलग्न विभाग व इतर शासकीय विभाग, तसेच विविध राष्ट्रीयकृत बँकांच्या कक्षांचाही समावेश असेल. संमेलनात खते, औषधे, बियाणे, अवजारे, जैवतंत्रान, दुग्धशाळा, कुक्कुटपालन, सौरऊर्जा, पॅकेजिंग, सेंद्रिय उत्पादने आदी उत्पादन व विपणन करणा-या अनेक कंपन्या सहभागी होणार आहेत. या महोत्सवाचा लाभ अधिकाधिक शेतक-यांनी घ्यावा, असे आवाहन जिल्हा अधिक्षक कृषी अधिकारी अनिल खर्चान, आत्माचे प्रकल्प संचालक ए. के. मिसाळ आदींनी केले आहे.

Leave A Comment