Site Logo
ब्रेकिंग न्यूज़
  • आरबीआय गव्हर्नर उर्जित पटेल यांचा राजीनामा
  • मल्ल्याच्या प्रत्यार्पणास लंडन कोर्टाची मंजुरी
  • उर्जित पटेल के बाद शक्तिकांत दास बने रिजर्व बैंक ऑफ इंडिया के नए गवर्नर

न्यायदानाच्या क्षेत्रात अमरावतीचे मोठे योगदान -न्यायमूर्ती शरद बोबडे जिल्हा व सत्र न्यायालयाचे उद्‌घाटन

अमरावती:देशात कायदा हा सर्वोच्च आहे. सामान्य माणसाचे हित जपण्याचे काम हा कायदा करीत असतो. या न्यायदानाच्या क्षेत्रात अमरावतीच्या अनेक मान्यवरांनी मोठे योगदान दिले आहे, असे प्रतिपादन सर्वोच्च न्यायालयाचे न्यायमूर्ती शरद बोबडे यांनी केले. ते आज जिल्हा व सत्र न्यायालयाच्या नुतन इमारतीच्या उद्‌घाटनप्रसंगी बोलत होते. यावेळी मुंबई उच्च न्यायालयाच्या प्रभारी मुख्य न्यायमूर्ती श्रीमती विजया ताहिलरमाणी, मुंबई उच्च न्यायालयाचे न्यायमूर्ती भुषण गवई, प्रदीप देशमुख, सुनील शुक्रे, विजय आचलीया, पालकमंत्री प्रवीण पोटे-पाटील, विधी व न्याय विभागाचे राज्यमंत्री डॉ. रणजीत पाटील, प्रमुख जिल्हा व सत्र न्यायाधीश अनिल पानसरे, जिल्हा वकील संघाचे अध्यक्ष प्रशांत देशपांडे आदी उपस्थित होते. न्यायमूर्ती श्री. बोबडे म्हणाले, न्यायदानाच्या क्षेत्रात विदर्भाला प्रथा आणि परंपरांची उच्च परंपरा लाभला आहे. त्यामध्ये अमरावती बार असोशिएशन ही सर्वात जुन्या बार असोशिएशनपैकी एक आहे. या बारच्या माध्यमातून राज्यघटनेला अभिप्रेत असलेले कायद्याचे राज्य महत्त्वाचे ठरले आहे. देशात कायदा हा सर्वोच्च असून या कायद्याने सर्वसामान्य नागरीकांचे हित जपले आहे. न्याय्य बाजू मांडण्यासाठी जिल्हा न्यायालय किती उपयुक्त ठरतात हे नुकत्याच झालेल्या रतलाम प्रकरणावरून दिसून आले आहे. जनतेच्या आशा-आकांक्षा पूर्ण करणारे हे जिल्हा न्यायालये आहेत. या आकांक्षा पूर्ण करण्यासाठी अमरावतीचे दादासाहेब खापर्डे, श्री. मुधोळकर, मोरोपंत जोशी, हबीलदास साटम, डॉ. पंजाबराव देशमुख, रा. सु. गवई, प्रतिभा पाटील यांच्यासारख्या अनेक मान्यवरांनी न्यायपालिकेच्या क्षेत्रात मोठे योगदान दिले आहे. नव्याने निर्माण झालेली जिल्हा न्यायालयाची इमारत सर्वांगसुंदर असून न्यायदानाच्या क्षेत्रात उच्च परंपरा कायम राखेल, असा विश्वास न्यायमूर्ती श्री. बोबडे यांनी व्यक्त केला. मुंबई उच्च न्यायालयाच्या प्रभारी मुख्य न्यायमूर्ती श्रीमती विजया ताहिलरमाणी म्हणाल्या, न्यायदानाच्या क्षेत्रात जिल्हा न्यायालयांची भूमिका महत्त्वाची आहे. त्यामुळे या न्यायालयांमध्ये गुणवत्तापूर्वक कामकाज होण्यासाठी उत्कृष्ट पायाभूत सुविधा असणे गरजेचे आहे. त्यासोबतच नव्या तंत्रज्ञानाचा उपयोग करून घेण्यासाठी उच्च न्यायालय पुढाकार घेत आहे. न्यायदानाच्या क्षेत्रात आता विश्वसनीयता, अवलंबित्व, विश्वासार्हता आता महत्त्वपूर्ण ठरत आहे. न्यायदानासोबतच जनजागृतीही होत असल्यामुळे ई-कोर्टसारख्या नव्या तंत्रज्ञानाच्या मदतीने न्यायदान पूर्ण क्षमतेने होणे गरजेचे आहे. इमारतीचे बांधकाम करणारे नितीन गबने आणि सार्वजनिक बांधकाम विभागाचे अधीक्षक अभियंता विवेक साळवे यांचा सत्कार न्यायमुर्ती श्रीमती विजया ताहिलरमाणी यांच्याहस्ते करण्यात आला. अनिल पानसरे यांनी प्रास्ताविक केले. न्यायमूर्ती भूषण गवई यांनी अमरावती बार असोशिएशनच्या वाटचालीची माहिती दिली. प्रशांत देशपांडे यांनी स्वागतपर भाषण केले. न्यायाधीश डी. डब्ल्यू मोडक यांनी आभार मानले. कार्यक्रमाला लोकप्रतिनिधी, कर्मचारी-अधिकारी उपस्थित होते.

Leave A Comment