Site Logo
ब्रेकिंग न्यूज़
  • आरबीआय गव्हर्नर उर्जित पटेल यांचा राजीनामा
  • मल्ल्याच्या प्रत्यार्पणास लंडन कोर्टाची मंजुरी
  • उर्जित पटेल के बाद शक्तिकांत दास बने रिजर्व बैंक ऑफ इंडिया के नए गवर्नर

विस्तारीत स्त्री रुग्णालय, उड्डाणपुलाचे उत्साहात भुमिपूजन

जिल्ह्यात 20 हजार 500 कोटी रुपयांची विविध विकास कामे होत आहेत. योजनांची प्रभावी अंमलबजावणी व भविष्यकाळाची दूरदृष्टी ठेवून नव्या कामांचा आरंभ यामुळे येणारा काळ उज्ज्वल ठरेल, अशी ग्वाही पालकमंत्री प्रवीण पोटे-पाटील यांनी आज येथे दिली. जिल्हा स्त्री रुग्णालयाची 200 खाटांची विस्तारित इमारत आणि चित्रा चौक ते नागपुरी गेटपर्यंतच्या उड्डाणपुलाचे भुमिपूजन करताना ते बोलत होते. नगरविकास राज्यमंत्री डॉ.रणजीत पाटील, खासदार आनंदराव अडसूळ, आमदार सर्वश्री डॉ. सुनील देशमुख, डॉ.अनिल बोंडे, रवी राणा, महापौर संजय नरवणे, उपमहापौर संध्याताई टिकले, सा.बां.विभागाचे प्र. मुख्य अभियंता विवेक साळवे, जिल्हा शल्यचिकित्सक डॉ. श्यामसुंदर निकम आदी उपस्थित होते. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांचे विमानतळावर आगमन होण्यास अडथळा आल्याने ते येऊ शकले नाहीत. तथापि, विकासकामे वेळेत होणे आवश्यक असल्यामुळे उद्घाटन समारंभ उरकून घ्यावा असा आग्रह मुख्यमंत्र्यांनी धरला, असे सांगून श्री.पोटे-पाटील म्हणाले की, केंद्रीय मंत्री नितीन गडकरी यांनी केंद्र शासनाकडून जिल्ह्यातील अनेक विकासकामे मंजूर केली. व मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी अनेक कामांचा केंद्राकडे पाठपुरावा केला. त्यामुळे अनेक कामांना आरंभ होत आहे. उड्डाणपुल व विस्तारित स्त्री रुग्णालयाचे काम दोन वर्षांत पूर्ण करण्यात येणार आहे. नवनवी विकासकामे व जलयुक्त शिवार, कृषी संजीवनी, जल संजीवनी आदी योजनांची प्रभावी अंमलबजावणी अशी नानाविध पातळ्यांवरील विकासप्रक्रिया गतीने होत आहे. ते पुढे म्हणाले की, ‘मॅग्नेटिक महाराष्ट्र’सारख्या उपक्रमातून महाराष्ट्रात १६ लाख कोटी रुपयांची गुंतवणूक येऊ घातली आहे. अमरावती जिल्ह्यात वस्त्रोद्योग व विविध उद्योगांमुळे ५० हजार लोकांना थेट तर १ लाखाहून अधिक लोकांना अप्रत्यक्ष रोजगार मिळणार आहे. शहरात भविष्यकाळाचा विचार करुन पाणीपुरवठ्याची भक्कम यंत्रणा साकार होत आहे. शहरात हॉकी स्टेडिअम, क्रीडा संकुलासह उड्डाणपुल परिसरातील नागरिकांसाठी रोजगार निर्मितीसाठी स्वतंत्र बाजारपेठ उभारण्यात येईल जेणेकरुन रोजगारनिर्मिती होईल. आरोग्य संरक्षणाच्या दृष्टीने शहरातील एकही नाली खुली राहू नये म्हणून बंदिस्त नाल्यांचे कामही हाती घेण्यात येणार आहे. डॉ. देशमुख म्हणाले की, शहरातील वाहतुकीची कोंडी लक्षात घेता उड्डाण पुलाची गरज होती. पठाण चौकातील नागरिकांना इतरत्र जाण्यासाठी इतवारा बाजारापर्यंत यावे लागत होते. उड्डाणपुलामुळे हा त्रास वाचणार आहे. केंद्रीय मंत्री नितीन गडकरी यांनी केंद्रीय रस्ते निधीतून ६० कोटी रुपये मंजूर केले. दोन वर्षांत हे काम पूर्ण होईल. शहराची वाढ लक्षात घेता २०० खाटांचे स्त्री रुग्णालय साकारले जात आहे. त्याचा कष्टकरी वर्गाला लाभ मिळेल. उड्डाणपूल हा दोन समाजांना जोडणारा पूल असल्याने त्याचे महत्व मोठे आहे, असे श्री. अडसूळ म्हणाले. २०० खाटांचे विस्तारित स्त्री रुग्णालय 16 हजार 552 चौरस मीटर बांधकाम करण्यात येणार आहे. या तीन मजली इमारतीत बाह्यरूग्ण, अतिदक्षता कक्ष, अपघात कक्ष, लेबर वार्ड,शस्त्रक्रिया कक्ष, औषधी दुकान, रेडिओलॉजी कक्ष, हिरकणी कक्ष, पीएनसी, आयसीटीसी रुम, ब्लड बँक, डॉक्टरांचे निवास व्यवस्था, व्हीसी रुम,सेमीनार हॉल, मिटींग हॉल आदी सुविधा उपलब्ध करण्यात येणार आहे. रूग्णालयाच्या इमारतीसाठी सुमारे 38 कोटी रूपये खर्च येणार आहे. उड्डाणपूल नागपुरी गेटपासून शहराच्या चारही दिशेने जाणाऱ्या उड्डाणपुलाची लांबी 1 हजार 543 मीटर असून पुलाच्या दोन्ही बाजूस काँक्रीट रस्त्यांची निर्मिती करण्यात येणार आहे. या संपूर्ण स्थापत्य बांधकामास 58 कोटी निधीची तरतूद करण्यात आली आहे. शहरातील हा परिसर मुख्य बाजारपेठेमुळे वर्दळीचा आहे. उड्डाणपुलामुळे वाहतूक व्यवस्था सुरळीत होण्यास मदत होणार आहे.

Leave A Comment