Site Logo
ब्रेकिंग न्यूज़
  • आरबीआय गव्हर्नर उर्जित पटेल यांचा राजीनामा
  • मल्ल्याच्या प्रत्यार्पणास लंडन कोर्टाची मंजुरी
  • उर्जित पटेल के बाद शक्तिकांत दास बने रिजर्व बैंक ऑफ इंडिया के नए गवर्नर

लोकशाही मूल्यांच्या जपणूकीसाठी माध्यमांनी संवेदनशीलता जोपासण्याची गरज

अमरावतीःलोकशाहीने दिलेल्या अभिव्यक्तीस्वातंत्र्याचा वापर करताना लोकशाहीच्या मूल्यांच्या जपणूकीसाठी माध्यमांनी संवेदनशीलताही जोपासण्याची गरज आहे, असा सूर विविध मान्यवरांनी माध्यमांसमोरील आव्हाने या विषयावरील चर्चासत्रात लावला. राष्ट्रीय प्रेस दिनानिमित्त जिल्हा माहिती कार्यालय आणि श्रीशिवाजी कला व वाणिज्य महाविद्यालयाचा जनसंवाद विभाग यांच्या संयुक्त विद्यमाने माध्यमांसमोरील आव्हाने या विषयावरील चर्चासत्र महाविद्यालयाच्या सभागृहात झाले. प्राचार्य डॉ. स्मिता देशमुख अध्यक्षस्थानी होत्या. विदर्भ मतदारचे संपादक दिलीप एडतकर, अमरावती श्रमिक पत्रकार संघाचे कोषाध्यक्ष गिरीश शेरेकर, सकाळचे पत्रकार गोपाल हरणे, जनसंवाद विभागाचे डॉ. कुमार बोबडे, जिल्हा माहिती अधिकारी हर्षवर्धन पवार उपस्थित होते. श्री. एडतकर म्हणाले की, सत्याची जोपासना हे पत्रकारितेचे कर्तव्य आहे. ही जबाबदारी पेलण्यासाठी संवेदनशीलता जिवंत असली पाहिजे. त्यामुळे सर्वसामान्यांच्या व्यथांशी नाळ जुळलेली माणसे पत्रकारितेत आली तर सामाजिक प्रक्रियेला निश्चित चांगले वळण मिळेल. डॉ. देशमुख म्हणाल्या की, माध्यमांनी मूक राहणे हे लोकशाहीसाठी धोकादायक असते. त्यामुळेच स्वातंत्र्य, समता, बंधुता आणि न्याय या लोकशाहीच्या मूल्यांच्या जोपासनेसाठी निर्भीड अभिव्यक्ती होणे गरजेचे आहे. केवळ व्यावसायिक हेतूपोटी पत्रकारितेच्या मूल्यांना बाधा येता कामा नये. त्यासाठी सामाजिक भान जागृत असलेल्या लोकांनी पत्रकारितेकडे वळले पाहिजे, अशी गरज श्री. शेरेकर यांनी व्यक्त केली. प्रसारमाध्यमे ही लोकांचे व्यासपीठ आहेत. त्यामुळे लोकहितासाठी त्यांचा उपयोग झाला पाहिजे, असे श्री. हरणे यांनी सांगितले. प्रा. रुपेश फसाटे, प्रा. अमित त्रिवेदी, प्रा. अर्चना सदार, डॉ. वर्षा चिखले यांनी स्वागत केले. डॉ. बोबडे यांनी सूत्रसंचालन केले. श्री. पवार यांनी प्रास्ताविक केले. जयंत सोनोने यांनी आभार मानले. प्रा. अविनाश देशमुख, डॉ. महेंद्र मेटे, डॉ. किशोर साबळे, प्रा. गजानन भारती यांच्यासह अनेक पत्रकार, पत्रकारितेचे विद्यार्थी व अभ्यासक या कार्यक्रमाला उपस्थित होते.

Leave A Comment