Site Logo
ब्रेकिंग न्यूज़

सहकारी सूत गिरण्यांना उर्जितावस्थेत आणण्यासाठी समिती गठीत करणार - सुभाष देशमुख

राज्यातील अनेक सहकारी सूत गिरण्या अडचणीत आहेत. सर्व सूत गिरण्यांना उर्जितावस्थेत आणण्यासाठी, त्यांच्या अडचणी समजून घेण्यासाठी लवकरच एक समिती नेमण्यात येईल, असे सहकार व वस्त्रोद्योग मंत्री सुभाष देशमुख यांनी आज सांगितले. राज्यातील सर्व सूत गिरण्यांच्या अडचणी समजून घेण्यासाठी महाराष्ट्र राज्य सहकारी वस्त्रोद्योग महासंघ आणि सहकारी सूत गिरण्यांच्या प्रतिनिधींसोबत मंत्रालयात आयोजित बैठकीत ते बोलत होते. श्री. देशमुख म्हणाले, सहकार क्षेत्रात चांगले काम करणा-यांना शासनाचे नेहमी सहकार्य आहे. सूत गिरण्यांना उर्जितावस्था आणण्यासाठी शासन प्रयत्नशील असून कापसाच्या गाठी सूत गिरण्यांच्या गोदामामध्ये ठेवण्याबाबतचा प्रस्ताव शासनाच्या विचाराधीन आहे. सहकारी सूत गिरण्या अडचणीत का आल्या, खासगी, आंतरराष्ट्रीय पातळीच्या सूत कंपन्यांशी स्पर्धा करताना येणा-या समस्या आणि राज्यातील सूत गिरण्यांच्या अडचणींचा अभ्यास करण्यासाठी एक समिती गठीत करण्यात येणार असल्याचे त्यांनी यावेळी सांगितले. वस्त्रोद्योग मंत्री सुभाष देशमुख यांच्या अध्यक्षतेखाली झालेल्या या बैठकीला महाराष्ट्र राज्य सहकारी वस्त्रोद्योग महासंघाचे अध्यक्ष अशोक स्वामी, अण्णासाहेब डांगे, प्रा. के. डी. कुराडे, सविता गायकवाड, किशोरी आवाडे आदिंसह सूत गिरण्यांचे प्रतिनिधी व संबंधित अधिकारी उपस्थित होते

Leave A Comment