Site Logo
ब्रेकिंग न्यूज़

संविधान दिनानिमित्त संविधान दौड आणि संविधान साहित्य परिषद-सामाजिक न्यायमंत्री राजकुमार बडोले

संविधान दिन 26 नोव्हेंबर रोजी साजरा करण्यात येतो. यावर्षी संविधान दिनानिमित्त वरळी सी-फेस ते चैत्यभूमी, दादर पर्यंत संविधान दौडचे आयोजन करण्यात येणार आहे. तर 3 डिसेंबर, 2017 रोजी संविधान साहित्य परिषदेचे आयोजन करण्याचे करण्यात येणार आहे. यासाठी आवश्यक ते सर्व नियोजन सामाजिक न्याय विभागा अंतर्गत कार्यरत असलेल्या विविध संस्थांनी करावे, असे निर्देश सामाजिक न्यायमंत्री राजकुमार बडोले यांनी आज येथे दिले. संविधान दिन साजरा करण्याच्या अनुषंगाने मंत्रालयात आयोजित केलेल्या बैठकीस श्री.बडोले बोलत होते. या बैठकीस आमदार भाई गिरकर, अनुसूचित जाती आयोगाचे सदस्य सी. एस. थुल, सामाजिक न्याय विभागाचे सचिव दिनेश वाघमारे, बार्टीचे महासंचालक राजेश धाबरे, पोलीस विभागाचे, मुंबई महापालिकेचे, आरोग्य विभागाचे वरिष्ठ अधिकारी तसेच समता प्रतिष्ठानचे अधिकारी यावेळी उपस्थित होते. श्री. बडोले पुढे म्हणाले, संविधानविषयी जनसामान्यांमध्ये जागृती व्हावी या उद्देशाने संविधान दिन साजरा करण्यात येतो. यावर्षी संविधान दिनानिमित्त संविधान दौड आयोजित करण्यात आली असून या दौडमध्ये मॅरॉथॉनमध्ये धावणारे धावपटू, क्रीडा क्षेत्रातील व्यक्ती, महाविद्यालयातील एन.सी.सी., एन.एस.एस. चे विद्यार्थी, तसेच शालेय विद्यार्थी, स्थानिक परिसरातील सामाजिक क्षेत्रात कार्यरत असणाऱ्या विविध संस्थांचे प्रतिनिधी, सामाजिक न्याय विभागा अंतर्गत कार्यरत असणारे विविध महामंडळाचे अधिकारी/कर्मचारी यांना आमंत्रित करावे. या दौडमध्ये विविध गट धावणार असल्याने प्रत्येक गटानुसार संविधान दौडची विभागणी करावी. वाहतुकीचे योग्य नियंत्रण व समन्वय वाहतूक शाखेने करावे. संविधान दौडला मोठ्या प्रमाणात प्रतिसाद मिळण्याचे अपेक्षित असल्याने तज्ज्ञ डॉक्टर व औषधांच्या साठ्यांसह रुग्णवाहिका उपलब्ध कराव्यात. या संविधान दौडच्या कार्यक्रमाचे समन्वय समता प्रतिष्ठानच्या मार्फत करण्यात येणार असल्याचेही त्यांनी यावेळी सांगितले. या दौडमध्ये सहभाग घेणाऱ्यांची नोंदणी करावी. त्यांना नोंदणी क्रमांक द्यावा, अशा विविध सूचना आमदार भाई गिरकर तसेच अनुसूचित जाती आयोगाचे सदस्य सी. एस. थुल यांनी केल्या. वरळी सी-फेस येथे संविधान उद्देशिकेचे वाचन करुन संविधान दौडची सुरुवात होऊन संविधान दौड चैत्यभूमी येथे समाप्त होईल. दौड मधील विजेत्यांना पारितोषिक आणि प्रमाणपत्र देण्यात येतील. तसेच दौडमधील सहभागी झालेल्यांचा प्रमाणपत्र देऊन सन्मान करण्यात येईल, असे बार्टीचे महासंचालक राजेश धाबरे यांनी सांगितले.

Leave A Comment