Site Logo
ब्रेकिंग न्यूज़

जलयुक्त शिवार अभियानामध्ये विभागात 2 हजार 749 गावात प्रभावी अंमलबजावणी

नागपूर:जलयुक्त शिवार अभियानाच्या प्रभावी अंमलबजावणीमुळे नागपूर विभागातील 2 हजार 749 गावांमध्ये झालेल्या विविध उपाययोजनांमुळे शाश्वत सिंचनासोबतच पिण्याच्या पाण्यासह टंचाईवर मात करतांनाच भूगर्भातील जलाशयात लक्षणिय वाढ झाली आहे. जलयुक्त शिवार अभियानाच्या माध्यमातून शेतकऱ्यांना अडचणीच्या वेळी पिकांना सूलभपणे पाणी देणे शक्य झाल्यामुळे कृषी उत्पादन वाढीला सहाय्यभूत ठरले आहे. विभागात सरासरीच्या 70 टक्के पाऊस झालेला असल्यामुळे जलयुक्त शिवार अभियान राबविण्याला प्राधान्य दिले आहे. विभागातील 3 हजार 743 गावापैकी 2 हजार 749 गावांची जलयुक्त शिवार अभियानासाठी निवड करण्यात आली असून यामध्ये 2015-16 मध्ये 1 हजार 077 गावे, 2016-17 मध्ये 915 गावे, तर 2017-18 मध्ये 757 गावे निवडण्यात आली आहे. जिल्हास्तरावर या अभियानाला लोकांचा उत्स्फूर्त सहभाग मिळत असल्यामुळे हे अभियान जनतेच्या अभियान म्हणून झाले असल्याचे माहिती विभागीय आयुक्त अनूप कुमार यांनी दिली. विभागात मागील तीन वर्षापासून जलयुक्त शिवार अभियान राबविण्यात येत असून याअंतर्गत भूजलाचे पुनर्भरण व जमिनीवर पाण्याची साठवणूक करुन संरक्षित सिंचन क्षमता निर्माण करण्यासाठी मातीनाला बांध, दगडीबांध, गॅरीयन बंधारे, सीसीटी, भातखचरे, सिमेंट बंधारे आदी कामे घेण्यात येत आहे. मागील दोन वर्षात 1 हजार 192 गावांमध्ये जलयुक्त शिवार अभियानाच्या कामामुळे 1 हजार 789 गावे जल परिपूर्ण झाली असून या गावामध्ये 43 हजार 111 विविध कामे पूर्ण करण्यात आली आहे. तसेच या अभियानाअंतर्गत 156.21 घनमीटर गाळ काढण्यात आला आहे. यामध्ये गाळाने भरलेले नाले, तसेच विविध तलावांचा समावेश आहे. गाळमुक्त धरण व गाळयुक्त शेती या अभियानाअंतर्गत शेतकऱ्यांच्या शेतातही काढलेला गाळ देण्यात आला आहे. मागील दोन वर्षात झालेल्या जलयुक्त शिवार अभियानाच्या विविध कामामुळे विभागात 2 लक्ष 50 हजार सस्त्र घनमीटर पाणीसाठा झाला असून त्यामुळे सरासरी 1 लाख 52 हजार 821 क्षेत्राला संरक्षित सिंचनाचा लाभ झाला आहे. अपुरा पाऊस तसेच पावसातील खंड यामुळे पिकांना जीवनदान देण्यासाठी जलयुक्त शिवार अभियानामार्फत निर्माण झालेले जलसाठे उपयुक्त ठरत आहे. सन 2015 व 2016-17 या दोन वर्षात विविध उपाययोजनावर 829 कोटी 75 लक्ष रुपये खर्च झाले आहे. जलयुक्त शिवार अभियानाअंतर्गत 2015-16 यावर्षात 1077 गावात 23 हजार 379 कामे पूर्ण झाली आहे. या कामांमुळे 1 लक्ष 89 हजार 859 टीएमसी एवढा पाणीसाठा निर्माण झाला असून 1 लाख 9 हजार 108 हेक्टर क्षेत्रात दोन पाणी देण्यासाठी संरक्षित सिंचनाखाली आले आहे. 2016-17 यावर्षात 995 गावात 22 हजार विविध जलसंधारणाची कामे घेण्यात आली आहे. या कामामुळे 60 हजार 185 टीएमसी पाणीसाठा निर्माण झाला असून 43 हजार 713 हेक्टर क्षेत्राला दोन पाणी देण्यासाठी संरक्षित सिंचन सुविधा उपलब्ध झाली आहे. पाणलोट क्षेत्रनिहाय 757 गावांची निवड जलयुक्त शिवार अभियानाच्या यशस्वीतेनंतर यावर्षीपासून गावाच्या शिवाराऐवजी गावाचे पाणलोट क्षेत्र हे घटक माणून गावाची निवड करण्यात आली आहे. या अभियानाच्या माध्यमातून गावाचा संपूर्ण पाणीलोट क्षेत्र विकास करताना माथा ते पायथा या तत्वावर विविध कामे घेण्यात येणार आहे. विभागात या पध्दतीने 757 गावाची निवड करण्यात आली असून त्यानुसार गावा आराखडे तयार करण्यात येत आहे. या गावा आराखडयास ग्रामसभेची मान्यता घेवूनच कामांना सुरुवात करण्यात येणार असून यासाठी 146 कोटी 65 लक्ष रुपयाचा निधी उपलब्ध झाला आहे. विभागात गावनिहाय आराखडयानुसार नागपूर जिल्हयात 220 गावांची निवड करण्यात आली असून 3 हजार 419 कामे प्रस्तावित करण्यात आली आहे. भंडारा 56 गावे 1385 कामे, गोंदिया 63 गावे 2097 कामे, चंद्रपूर 169 गावे 8051 कामे, गडचिरोली 111 गावे 3971 कामे तर वर्धा जिल्हयातील 138 गावांची निवड करण्यात आली असून 2 हजार 120 कामांचा समावेश असल्याची माहिती विभागीय आयुक्त अनूप कुमार यांनी दिली.

Leave A Comment