Site Logo
ब्रेकिंग न्यूज़

धान, सोयाबीन, ज्वारी हमीभावानेच विक्री करा - सचिन कुर्वे

नागपूर: आधारभूत किंमतींचा धान्य खरेदी योजनेअंतर्गत कापूस, सोयाबीन, धान, मका, ज्वारी खरेदीसाठी केंद्रे सुरु करण्यात आली असून शेतकऱ्यांनी धान्य हमीभावापेक्षा कमी भावाने विकू नये, असे आवाहन जिल्हाधिकारी सचिन कुर्वे यांनी केले आहे. जिल्हयात जिल्हा प्रशासनाच्या वतीने मार्केटींग फेडरेशनमार्फत धान खरेदीचे 4 केंद्रे सुरु करण्यात आली असून यामध्ये रामटेक, महादूला (मौदा), भिवापूर व उमरेड या केंद्रांचा व हमीभाव एफएक्यू ज्वारी व मका खरेदीसाठी कळमेश्वर, हिंगणा, सावनेर, काटोल, नरखेड, नागपूर व बुटीबोरी येथे खरेदी केंद्र सुरु करण्यात आले आहे. ही केंद्रे तालुका सहकारी खरेदी विक्री संघमार्फत संचालित करण्यात आले आहे. आदिवासी विकास महामंडळातर्फे जिल्हयातील आदिवासी क्षेत्रामध्ये आदिवासी विविध कार्यकारी संस्थेमार्फत धान खरेदी करीता रामटेक तालुक्यातील पांढराबोडी, हिवरा बाजार, पवनी येथे खरेदी केंद्र सुरु करण्यात आली आहे. कापूस खरेदी करीता कापूस पनन महामंडळाद्वारे उमरेड, बाजारगाव, काटोल, पारशिवनी, कळमेश्वर, कोहळी व सीसीआयतर्फे नरखेड येथे आधारभूत किंमत कापूस खरेदी केंद्रे सुरु करण्यात आली असल्याची माहिती जिल्हाधिकारी सचिन कुर्वे यांनी दिली. सोयाबीन करीता जिल्हयात 4 केंद्रे सुरु करण्यात आली असून यामध्ये सावनेर, काटोल, उमरेड, कळमना येथे कृषी उत्पन्न बाजार समितीच्याआवारात सुरु करण्यात आले आहे. सर्व शेतकऱ्यांनी तालुका शेतकरी सहकारी खरेदी विक्री संस्थेच्या कार्यालयात व कृषी उत्पन्न बाजार समिती हमीभावात धान्य खरेदी करण्यासंदर्भात संपर्क साधावा, असे आवाहानही जिल्हाधिकारी सचिन कुर्वे यांनी केले आहे. केंद्र शासनाने आधारभूत किंमती जाहीर केले आहे. यामध्ये धान अ प्रत (एफएक्यू) रुपये 1590, धान साधारण प्रत (एफएक्यू) रुपये 1550, ज्वारी संक्ररीत रुपये 1700, ज्वारी मालदांडी रुपये 1725, मका रुपये 1425, सोयाबीन (एफएक्यू) रुपये 3050 (बोनससह), कापूस मध्य धागा रुपये 4020, कापूस लांब धागा रुपये 4320 जाहीर केला आहे. शेतकऱ्यांनी हमीभावापेक्षा कमी भावाने धान्य विकू नये, असे आवाहन जिल्हाधिकाऱ्यांच्या वतीने करण्यात आले आहे.

Leave A Comment